विरोधी पक्षांच्या एकजुटीचे दर्शन, सिन्हा यांचा राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी संसद भवनमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहिल्याने विरोधी पक्षांच्या मजबूत एकजुटीचे दर्शन घडले. सिन्हा यांना 17 हून अधिक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

पुढील महिन्यात 18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. याआधी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर सोमवारी यशवंत सिन्हा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्जाचे चार सेट राज्यसभेचे महासचिव पी. एस. मोदी यांच्याकडे सुपूर्द केले. पी. एस. मोदी निवडणूक अधिकारी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यात समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, सीपीएमचे सरचिटणीस सीताराम येचुरी, टीएमसीचे सुधींद्र कुलकर्णी, अभिषेक बॅनर्जी, राज्यसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आदींचा समावेश होता. सिन्हा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देणारे तेलंगणातील सत्ताधारी टीआरएसचे नेते सकाळीच पोहोचले होते. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हेदेखील सिन्हा यांना पाठिंबा देण्यासाठी हजर राहिले होते. सिन्हा हे एनडीए आघाडीने रिंगणात उतरवलेल्या द्रौपदी मुर्मू यांच्याशी लढत देणार आहेत.

तेलंगणा राष्ट्र समितीचाही सिन्हा यांना पाठिंबा

विरोधी पक्षांचा उमेदवार निवडताना गैरहजर राहिलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीनेही (टीआरएस) यशवंत सिन्हा यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. टीआरएसचे कार्यकारी अध्यक्ष के. टी. रामाराव यांनी सोमवारी ट्विटवरून याबाबत घोषणा केली. तसेच त्यांनी संसद भवनात प्रत्यक्ष हजर राहून सिन्हा यांना पाठिंबा दिला.

ही विचारांची लढाई – राहुल गांधी

यशवंत सिन्हा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ही विचारांची लढाई आहे. एकीकडे द्वेष, तर दुसरीकडे बंधुभाव, अशी प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.