
बिहारमधील मतदार फेरतपासणीच्या मुद्दय़ावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत आज प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत गदारोळ सुरू असतानाच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कागद फाडून अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने भिरकावले. त्यावरून वातावरण तापले आणि गोंधळात भर पडली. राज्यसभेतही गदारोळामुळे कामकाज होऊ शकले नाही. दोन्ही सभागृहांचे कामकाज 18 ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले.
सायंकाळी साडेचार वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताच हा गोंधळ झाला. भाजपचे खासदार जगदंबिका पाल हे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहत होते. त्यांच्या दिशेने काही सदस्यांनी कागद फेकले. जगदंबिका पाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रकार काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांच्या इशाऱ्यावरून झाला आहे. त्यांनी सदस्यांना कागद दिले आणि फाडून फेकण्यास सांगितले. हे तुम्हाला शोभत नाही, असे पाल म्हणाले. या प्रकारानंतर जगदंबिका पाल यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
लोकसभा व राज्यसभेत गदारोळामुळे दुपारपर्यंत कामकाज होऊ शकले नाही या गोंधळातच लोकसभेत खनिज संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी कामकाजातील व्यत्ययावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले.
मिंता देवीचा बोलबाला
इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज संसदेतही मतचोरीचा आणि मतदार यादीतील घोटाळ्याचा मुद्दा लावून धरला. प्रियांका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक खासदार मिंता देवी यांचे नाव व फोटो असलेले टी-शर्ट घालून आले होते. बिहारच्या मतदार यादीत 124 वर्षांच्या मिंता देवींचे नाव आहे. निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार, त्या पहिल्यांदा मतदार झाल्या आहेत. या घोटाळ्याकडे लक्ष वेधण्यासाठी खासदारांनी विशेष टी-शर्ट घातले होते.
राज्यसभेतही गदारोळ
बिहारमधील मतदारयाद्याच्या घोळावरून राज्यसभेतही गदारोळाची मालिका कायम राहिली. दुपारपर्यंत कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर आवश्यक कामकाज आटोपल्यानंतर राज्यसभेचे कामकाजदेखील सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
न्या. वर्मांविरोधात महाभियोगाला मंजुरी
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोगाची कारवाई करण्यास लोकसभेने मंजुरी दिली. या प्रकरणी दोन न्यायाधीश व एका अधिवक्त्याची पडताळणी समिती नेमली जाणार आहे. त्या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय होईल, असे लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले.