
सामना प्रतिनिधी । मुंबई
बेस्टच्या कर्मचाऱयांचे बोनसकडे डोळे लागून राहिलेले असताना बुधवारी विरोधकांच्या राजकारणामुळे बोनस लटकला आहे. कर्मचाऱ्यांना 5500 रु. बोनस देण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने समितीच्या मंजुरीसाठी आणला होता. मात्र हा प्रस्ताव आयत्यावेळी आल्याचे सांगत विरोधी पक्ष नेत्यांनी प्रस्ताव विचारात घेण्यास विरोध केला.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी केली खरी पण त्याबाबतचा रीतसर प्रस्ताव आणला नव्हता. त्यामुळे बैठकीत प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. बोनस दिल्यामुळे उपक्रमावर 22.50 कोटींचा खर्च येणार असल्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. मात्र 72 तासांच्या आत आलेले प्रस्ताव विचारात न घेण्याचा सदस्यांचा अधिकार असतो. तसा नियम आहे. प्रस्तावावर सदस्यांना विचार करण्यासाठी वेळ मिळावा या करिता हा नियम आहे. पण हाच नियम काढून विरोधीपक्षनेते रवी राजा यांनी हा प्रस्ताव पुढे ढकलण्याची मागणी केली. त्यामुळे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांना हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवावा लागला. महाव्यवस्थापक हे निवडणुकीच्या ड्युटीवर गेलेले असल्यामुळे बुधवारच्या बैठकीत या विषयी काहीही चर्चा होऊ शकली नाही.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा व त्यासाठी तरतूद करावी अशी मागणी सुनील गणाचार्य यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. त्यावर प्रशासनाने दिवाळी पूर्वीच्या बैठकीत नकारात्मक लेखी उत्तर दिले होते. मात्र तेव्हा सर्व सदस्यांनी महाव्यवस्थापकांवर दबाव आणल्यामुळे अखेर बोनस देण्यास ते तयार झाले. तशी तोंडी घोषणा महाव्यवस्थापकांनी केली होती. त्याकरिता तरतूद करण्यासाठी अवधीही सदस्यांनी दिला होता. मात्र याबाबतचा प्रस्ताव आणला नव्हता. आजच्या बैठकीत प्रशासनाने हा बहुप्रतिक्षित प्रस्ताव आणला खरा, पण विरोधकांच्या करंटेपणामुळे हा प्रस्ताव रखडला आहे.






























































