
हमीद दाभोलकर व ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात सनातन संस्थेने दाखल केलेला दहा कोटींचा बदनामीचा दावा गोवा येथून कोल्हापूर येथील दिवाणी न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. गोव्यातील फोंडा नगर दिवाणी न्यायालयात या दाव्याची सुनावणी सुरू आहे. हा खटला तेथून कोल्हापूर दिवाणी न्यायालयात वर्ग करावा, अशी मागणी करणारा अर्ज हमीद दाभोलकर व ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला होता. न्या. एन. जे. जमादार यांच्या एकल पीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली.
न्यायालयाने हा अर्ज मंजूर केला. खटल्याची सर्व कागदपत्रे सहा आठवड्यात फोंडा येथून कोल्हापूर दिवाणी न्यायालयात हस्तांतरीत करावीत. कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने या दाव्यावर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा, असे न्या. जमादार यांच्या एकल पीठाने आदेशात नमूद केले. या आदेशाला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी विनंती सनातन संस्थेने केली. ती मान्य करत न्यायालयाने या आदेशाला सहा आठवड्यांची अंतरिम स्थगिती दिली.
काय आहे प्रकरण
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सनातन संस्थेविरोधात बदमानीकारक भाष्य केल्याचा आरोप करत संस्थेने हा दावा दाखल केला. मात्र गोव्यात सनातनचे अनेक साधक आहे. तेथे सुनावणीला जाणे धोकादायक आहे. न्यायदानावर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा खटला कोल्हापूर येथे वर्ग करावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती.