
गणेश तुळशी,[email protected]
शेतकरी म्हटले की आपल्या डोळय़ासमोर एक पारंपरिक चित्र उभे राहते… गावात वंशपरंपरागत शेती करणारा शेतकरी… शिवाय बहुसंख्येने तरुणाई नोकरीसाठी शहराकडे वळत आहे… या पार्श्वभूमीवर शहरातील एक तरुण, ग्लॅमर विश्वातील अभिनेता ओमकार कर्वे पूर्णवेळ शेतीकडे वळतो ही संपूर्ण तरुणाईसाठी खरंच एक सकारात्मक गोष्ट आहे…
सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर जे अतिदूर त्यात मन भावे…
कविवर्य बा. भ. बोरकरांनी केलेलं मानवी मनाचं हे यथार्थ चित्रण म्हणजे वैश्विक आणि त्रिकालाबाधित सत्य आहे. जे जवळ आहे, सहज उपलब्ध आहे त्यात माणसाचं मन रमत नाही. त्याला खुणावत असतात त्या सतत दूरच्याच गोष्टी! तोच तोपणा आणि त्यातून होणारी घुसमट झटकून टाकण्यासाठी माणूस खास करून तरुण वर्ग सातत्याने नावीन्याचा शोध घेत असतो. धडपडत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठी अभिनेता ओमकार कर्वे. मुंबईसारखी मायानगरी आणि चित्रपटसृष्टीसारखी झगमगाटी दुनिया सोडून हा तरुण चक्क शेतीकडे वळला आहे. आपल्या तरुण मित्रांना सोबत घेऊन तो नैसर्गिक शेती करतो आहे. गावाकडच्या हिरवाईने शहरांतील सिमेंटच्या जंगलात वावरणाऱया तरुणाईला भुरळ घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच शहरातील तरुणांची पावले आता शेतीकडे वळू लागली आहेत. ही सुरुवात आहे. हे प्रमाण आज कदाचित कमी असेलही मात्र भविष्यात शेती आणि विशेष करून रसायनविरहित नैसर्गिक शेतीचे एका चळवळीत रूपांतर होईल त्यावेळी मात्र शहरांतून खेडय़ांकडे विस्थापित होण्याचे प्रमाण नक्कीच वाढू लागेल.

समाजातील कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणामुळे आणि कर्करोगाने मृत्युमुखी पडणाऱयांच्या वाढत्या संख्येमुळे व्यथित झालेल्या ओमकारने काही नामवंत डॉक्टरांशी चर्चा केली. सगळ्यांनी एका सुरात सांगितले कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे ते रासायनिक शेतीमुळेच. तुमच्या घरातील भाजीपाल्यापासून अन्नधान्यापर्यंत सारे काही रसायनयुक्तच असते. त्यामुळेच कॅन्सरचे प्रमाण झपाटय़ाने वाढते आहे. ओमकारने त्याच क्षणी निर्णय घेतला रसायनमुक्त शेतीमध्ये झोकून देण्याचा.
पुरातन काळापासून चालत आलेल्या पारंपरिक आणि नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून शंभर टक्के सेंद्रीय भाजीपाला आणि शक्य तेवढी धान्ये निर्मिती करण्याचा संकल्प घेऊन ओमकारने मुंबई सोडली. नाशिक आणि सातारा जिह्यांत थोडीफार जमीन खरेदी केली. काही शेतकऱयांनाही सोबत घेतले. लागवडीपासून पिकांच्या वाढीनंतर फवारणीपर्यंत सगळे काही नैसर्गिक. गोमुत्र, शेणखत, जीवामृत, शेणरबडी आणि दशपर्णी अर्क यांचाच वापर खत आणि फवारणीसाठी सुरू केला.
ओमकारची नैसर्गिक शेती आता जोमात सुरू आहे. डायबिटीसच्या पेशंटसाठी उपयुक्त असलेला खपली गहू हे त्याचे सेंद्रीय उत्पादन सुपरहिट ठरले आहे. या गव्हासाठी मुंबई, पुणे आणि नाशिकमधून ऍडव्हान्स बुकिंग मिळते. याशिवाय ज्वारी, हळद, गूळ आणि तूपही सेंद्रीय पद्धतीने तयार करून थेट बाजारात उतरवले जाते.
रासायनिक खतांचा आणि जीवघेण्या औषधांचा सर्वाधिक वापर होतो तो भाजीपाल्यावर. त्यामुळे टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, मुळा, गाजर, लाल माठ, मेथी, पालक, शेपू, कांद्याची पात, गवार, मटार, कोथिंबीर, दुधी भोपळा हा सगळा भाजीपाला शंभर टक्के सेंद्रीय पद्धतीने पिकवून बाजारात पाठविण्याची उत्तम सिस्टीम ओमकार कर्वे आणि त्याच्या तरुण मित्रांनी लावली आहे. सेंद्रीय उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी फेसबुक आणि व्हॉट्सऍपसारख्या सोशल मीडियाचा मुक्त वापर करून नैसर्गिक शेतीचा माल दर आठवडय़ाला ते अख्ख्या मुंबईत आणि पुणे व नाशिक येथेही मोठय़ा प्रमाणात विकतात. यातून उलाढालही दिवसेंदिवस वाढते आहे.
काहीतरी चांगलं करायचं म्हणून…
आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या एकाच भावनेतून मी नैसर्गिक शेतीकडे वळलो. जगभरातूनच सेंद्रीय उत्पादनांना तुलनेने चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱयांची परिस्थिती सुधारेल असा विश्वास ओमकार व्यक्त करतो. असे अनेक ओमकार विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात नवनवीन प्रयोग करत आहेत. कोणी हुरडा आणि रानमेव्याच्या माध्यमातून ऍग्रो टुरिझम यशस्वी करून दाखवत आहे. तर कोणी फळबागा, रोपवाटिकांचे प्रकल्प राबवत आहेत. शेतीकडे आणि खेडय़ाकडे वळणारी तरुणाईची ही पावले मागे न खेचता उलट त्यांना भक्कमपणे पाय रोवून उभे राहण्यासाठी आणखी बळ देण्याचे काम कुटुंबीयांनी आणि समाजानेही केले तर नैसर्गिक शेतीसारख्या चळवळीसोबतच ‘खेडय़ांकडे चला’ हे गांधीजींचे स्वप्नही नक्कीच पूर्ण होईल.
पीककर्ज कसे मिळते?
शेती करायची म्हणजे त्यासाठी कर्ज घेणे गरजेचे ठरते. शेतकऱयांना सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून पीककर्ज घेता येऊ शकते. यासाठी त्या बँकेचा खातेदार होणे गरजेचे असते. जुने खातेदार थेट पीककर्जासाठी अर्ज करू शकतात. यासाठी यात नमुना 8अ उतारा, 7-12 उतारा, सोसायटीचा कर्ज नसल्याचा दाखला आणि परिसरातील बँकांचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र असावे लागते. एक लाखांपर्यंतच्या कर्जासाठी एवढी कागदपत्रे पुरेशी आहेत. मात्र त्याहून जास्त कर्ज हवे असेल तर मात्र शेतीचा नकाशा, बेबाकी प्रमाणपत्र (कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचा दाखला), ओलिताचं प्रमाणपत्र, चतुःसीमा प्रमाणपत्र आणि पृषी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागतो.

गच्चीतून शेती
आपल्याकडे मोठी गच्ची असल्यास तेथे आपण अगदी आंबा, पपई, केळी अशी झाडे लावून त्यांची फळे घेऊ शकतो. गच्चीत मोठय़ा कुंडय़ा अथवा ड्रमचा वापर करता येईल. याशिवाय शेततळ्यासाठी वापरण्यात येणारे जाडे काळे प्लॅस्टिक वापरून आपण आवश्यक त्या लांबी रुंदीचे वाफे गच्चीवर तयार करू शकतो. गच्चीवर वाफे करताना आधी विटा लावून त्यावर प्लॅस्टिक पसरावे व कडेने अपेक्षित उंचीच्या विटा लावून वाफे तयार करावे. यामध्ये मातीचे मिश्रण कुंडीत भरावे. त्या मिश्रणात शक्य असल्यास ट्रायकोडर्मा नावाची बुरशीची पावडर मिसळावी. कमी जागेत जास्त झाडे लावण्यासाठी आपण वेगवेगऴया उंचीवर वाढणारी झाडे एकत्र लावू शकतो. मल्टीलेअर पद्धतीने आपण एकाचवेळी विविध उत्पादने मिळवू शकतो.
मत्स्यशेती
तलावामध्ये कृत्रिमरित्या नैसर्गिक वातावरणात केली गेलेली माशांची पैदास म्हणजे मत्स्यशेती. माशांची ही पैदास कशी होते त्याचा अभ्यास करून, त्यानुसार स्थिती निर्माण करुन ही पैदास केली जाते. मासे अनेक लोकांच्या जेवणातील मुख्य पदार्थ असल्यामुळे त्याचे उत्पादन करुन त्यापासून व्यवसाय करून उत्पन्न मिळविणे हा त्यातील एक उद्देश आहे.
फळबाग लागवड
फळांची लागवड करूनही तरुणांनी शेती करायला हरकत नाही. राज्य शासनाने सर्वप्रथम 1991 पासून रोजगार हमी योजनेद्वारे फळबाग लागवड सुरू केली. या योजनेत निरनिराळ्या 19 प्रकारच्या फळपिकांचा आणि चार मसाले पिकांचा समावेश आहे. फळबागा लागवडीसाठी आणि बागांची तीन वर्षांपर्यंत जोपासना करण्यासाठी शासन अनुदान देते. याचबरोबर फळबाग लागवडीसाठी लागणारी तांत्रिक माहिती तसेच कलमे, रोपे यांचा पुरवठाही फळबाग विकास योजनेमार्फत केला जातो. फळबाग लागवड यशस्वी करण्यासाठी अनेक खासगी तसेच सहकारी संस्था कार्यरत आहेत.
फळे ही नाशवंत असतात. हीच फळबाग लागवडीची मोठी समस्या असल्यामुळे त्यांचे व्यवस्थापन महत्त्वाचे असते. फळांची साठवण करण्यापूर्वी ती थंड करणे, शीतगृहात साठवणे, व्यवस्थित पॅकिंग करणे महत्त्वाचे असते. द्राक्षे, अंजीर, बोरे ही फळे सुकवणे, संत्रा, आंबा, द्राक्षे, लिंबू यांचा रस काढून टिकवणे, आवळा, लिंबू, आंबा, करवंदे यापासून लोणची बनवणे, असे प्रक्रिया उद्योग निर्माण होत आहेत. यामुळे फळबागा लागवडीला भविष्यात चांगला वाव आहे.
सेंद्रीय शेती
सेंद्रीय शेती म्हणजे सजीव पर्यावरणीय रचना समजून घेऊन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती. सेंद्रीय शेती सध्या सुमारे 110 देशामध्ये केली जात असून तिचे प्रमाण वाढते आहे.

























































