
जगभरातील सिनेसृष्टीत अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया 94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे अवघ्या सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे. या पुरस्कार सोहळ्याचे काऊंटडाऊन सुरू झाले असून रविवार, 27 मार्च रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. हिंदुस्थानी वेळेनुसार सोमवार, 28 मार्च रोजी पहाटे 5.30 वाजल्यापासून डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा सोहळा लाईव्ह पाहता येणार आहे. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी हिंदुस्थानच्या ‘रायटिंग विथ फायर’ला नामांकन मिळाले आहे.
रिंटू थॉमस आणि सुश्मित घोष दिग्दर्शित ‘रायटिंग विथ फायर’ हा माहितीपट दलित महिलांकडून चालवल्या जाणाऱया ‘खबर लहरिया’ वृत्तपत्राच्या उदयावर प्रकाश टाकतो. या माहितीपटात मीरा आणि तिच्या सहकाऱयांची कथा दाखवण्यात आली आहे. ज्या पुरुषप्रधान संस्कृतीविरोधात आवाज उठवतात तसेच जात, लैंगिक अत्याचार पीडितांबाबत लिहितात. हॉलीवूड अभिनेता बेनेडिक्ट पंबरबॅचची मुख्य भूमिका असलेल्या ‘द पॉवर ऑफ डॉग’ या चित्रपटाला सर्वाधिक 12 नामांकने मिळाली आहेत तर वॉर्नर ब्रदर्सची निर्मिती असलेल्या ‘डय़ून’ या चित्रपटाला 10 नामांकने मिळाली आहेत.
यांच्यात रंगणार चुरस
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात ‘द हँड ऑफ गॉड’, ‘लुनानाः अ याक इन द क्लासरूम’, ‘द वर्स्ट पर्सन इन द वर्ल्ड ’, ‘ड्राईव्ह माय कार’ आणि ‘फ्ली’ या चित्रपटांना नामांकन जाहीर झाले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपट विभागासाठी ‘बेलफास्ट’, ‘कोडा’, ‘डोन्ट लूक अप’, ‘डय़ून’, ‘ड्राईव्ह माय कार’, ‘किंग रिचर्ड’, ‘लिकोरिस पिझ्झा’, ‘नाईटमेअर अॅली’, ‘द पॉवर ऑफ द डॉग’ आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली असून यापैकी कोणता चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
प्रियांकाचा देसी अंदाज
पुरस्कार सोहळ्यापूर्वी आयोजित प्री ऑस्कर सोहळ्यात बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा देसी अंदाज सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला होता. सोहळ्यात काळ्या रंगाच्या साडीत पोहोचलेल्या प्रियांकाने आपल्या देसी लूकने सर्वांचे लक्ष वेधले. तिच्या या लूकवर सर्वचजण फिदा झाले. यावेळी प्रियांकाने आपला एपंदरित प्रवास, निक जोनाससोबत झालेली पहिली भेट तसेच मुलीच्या आगमनानंतर आपल्या आयुष्यात कशाप्रकारे बदल झाले, याबाबत मुलाखत दिली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.





























































