
धाराशिव जिल्ह्यात कोरोना विळखा वाढत चालला असून आनखी 6 जणांचा पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 13 वर गेली आहे. या सहापैकी एक रुग्ण पुण्याहून तर इतर 5 रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. या रुग्णांपैकी तुळजापूर येथील एक महिला सहा महिन्याची गर्भवती असून धाराशिव शहरातील एक रुग्ण हा कॅन्सरने ग्रस्त आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन दक्ष झाले असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, अस्थापना 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
19 मे रोजी जिल्ह्यातील 49 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील कै. विलासराव देशमुख विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी 42 व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले असून 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. उर्वरित एकाच्या स्वॅबची पुर्नतपासणी होणार आहे. या सहा रुग्णांमध्ये परंडा तालुक्यातील खंडेश्वरी येथील 2, भूम तालुक्यातील गिरवली येथील एक 13 वर्षाचा मुलगा, धाराशिव शहरातील 1 तरुण, लोहारा तालुक्यातील जेवळी येथील 1 तरुण, तुळजापूर शहरातील एक एका गर्भवती महिलेचा समावेश आहे. यातील तुळजापूर शहरातील गर्भवती महिला ही पुण्याहून तर इतर पाच रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत.
धाराशिव जिल्ह्यात यापुर्वीच कोरोनाचे 7 रुग्ण आढळले असून आता या रुग्णांची संख्या 13 वर गेली आहे. यातील कळंब शहरातील महसूल कर्मचारी असणाऱ्या रुग्णांवर सोलापूर येथे उपचार सुरु आहेत. उर्वरित 12 रुग्णांवर धाराशिव जिह्यात उपचार सुरु आहेत.
46 व्यक्ती क्वारंटाईन
19 मे रोजी आढळून आलेल्या या सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 46 व्यक्तींना प्रशासनाच्या वतीने क्वारंटाईन करण्यात आले असून यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता 31 मे पर्यंत बंद
यापुर्वी धाराशिव जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याने धाराशिव जिह्यात अत्यावश्यक सेवासह इतर सर्व दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज सकाळीच जिल्हाधिकाऱयांनी आदेश काढून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.






















































