ऑस्ट्रोमेट्बाधितांचा समावेश दिव्यांग प्रवर्गात करा, शिवसेनेची लोकसभेत मागणी

330

ऑस्टोमी या आजाराने ग्रस्त असणार्‍या रुग्णांना जीवनात प्रचंड संघर्ष करावा लागतो. त्यांच्या रोजच्या दिनचर्येवर विपरीत परिणाम होतो. मूलभूत गरजांसाठीही त्यांना झगडावे लागते. अशा आजाराने ग्रस्त असणार्‍यांचा दिव्यांग प्रवर्गात समावेश करण्याची मागणी आज मंगळवारी शिवसेनेच्या वतीने लोकसभेत करण्यात आली.

लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहरात ऑस्टोमी या आजाराविषयी प्रश्न उपस्थित करत या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांना दिव्यांगाचा दर्जा देऊन, दिव्यांग प्रवर्गाच्या सर्व सुविधा दिल्या जाव्यात, अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली. ऑस्टोमी असोसिएशन ऑफ इंडिया 1975 पासून या आजाराने बाधित रुग्णांसाठी कार्यरत आहे. यामध्ये बाधित रुग्णाला घातक आजारापासून वाचवण्यासाठी, मलनिःसारणाचा त्याचा नैसर्गिक मार्ग कृत्रिम उपकरणाद्वारे कायमस्वरुपी बदलला जातो. कृत्रिम प्रणालीमध्ये त्यांच्या पोटावर प्लॅस्टिकची थैली पूर्णवेळ बसवावी लागते. या शस्त्रक्रियेमुळे, ऑस्टोमेट्स बाधितांचे त्यांच्या नैसर्गिक विधी आणि मूत्र मार्ग यावर नियंत्रण राहत नाही. त्यामुळे त्यांच्या दिनचर्येवर परिणाम होऊन मूलभूत गरजांसाठीही त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. ही बाब कीर्तिकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

दिव्यांगांप्रमाणेच सोयीसुविधा पुरवाव्यात

कृत्रिम मूत्र आणि मैला व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणारी साधने अत्यंत महाग असून या रुग्णांना गर्दीत मूत्र वाहून नेणारी पिशवी फुटेल अशी भीती कायम असते. रेल्वे प्रवासादरम्यान त्यांची उपकरणे खराब होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने ऑस्टोमेट्सना रेल्वे प्रवासात सवलत देण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे कीर्तिकर यांनी सांगितले. ऑस्टोमेट्सना शारीरिकदृष्टय़ा दिव्यांग प्रवर्गात समाविष्ट करावे आणि दिव्यांगांना पुरविल्या जाणार्‍या सोयी-सुविधा त्यांना उपलब्ध करून द्याव्यात, अशी आग्रही मागणी कीर्तिकर यांनी यावेळी केली.

आपली प्रतिक्रिया द्या