
दमदार अभिनय आणि कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूड गाजवणारा अभिनेता म्हणजे नीलेश दिवेकर. लॉकडाऊनमुळे नीलेशचा लूटकेस हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय. कोरोनाच्या संकटात शूटिंग ठप्प असताना लोकांना खऱया अर्थाने तणावमुक्त करण्याचे काम ओटीटीने केल्याचे नीलेशने यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
राजेश कृष्णन दिग्दर्शित आणि कपिल सावंत यांची पटकथा, संवाद असलेला ‘लूटकेस’ 31 जुलैला डिस्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होतोय. यात कुणाल खेमू, रसिका दुग्गल, विजय राज, रणवीर शौर्ये यांच्यासह नीलेश दिवेकर मुख्य भूमिकेत आहे. यात नीलेश विजय राज यांच्यासोबत खलनायकाच्या भूमिकेत आहे. ही भूमिका आपल्याला नशिबाने मिळाल्याचे नीलेशने सांगितले. तो म्हणाला, ‘दिग्दर्शक राजेशने फार वर्षांपूर्की माझे ‘फेरारी की सवारी’मधील काम पाहिले होते. तेव्हापासून माझ्यासोबत काम करण्याची त्यांची इच्छा होती. या निमित्ताने हा योग जुळून आला.’
लूटकेसचे कथानक एका सुटकेसभोवती फिरते. सगळ्य़ांना ही सुटकेस हवी असते. त्यामागचे कारण नेमके काय याचा उलगडा चित्रपटात होणार आहे. छोटय़ा छोट्या प्रसंगातून घडणारे सहजसुंदर विनोद हा चित्रपटाचा खरा यूएसपी आहे. त्यामुळे कोरोनाचे टेन्शन बाजूला सारून सहकुटुंब ओटीटीवर मनोरंजनाची लूटकेस लुटायला सज्ज व्हा. असे आवाहन निलेशने केले आहे. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट डिजिटल रिलीज होत आहे. मोठय़ा पडद्याची मजा ओटीटीवर नसली तरी हे माध्यम आज घराघरात पोहोचले असून मनोरंजनाची सगळी समीकरणे बदलल्याचेही त्याने सांगितले.
हल्ली ग्लॅमरला महत्त्व!
पूर्वी छोटय़ा पडद्यावरील कॉमेडी शोमध्ये कॉमिक टायमिंग असलेल्या कलाकारांना महत्त्व दिले जायचे.. हल्ली कॉमिक टायमिंग असलेल्या कलाकारांपेक्षा ग्लॅमरला अधिक महत्त्व दिले जाते अशी खंत नीलेशने व्यक्त केली. मालिकेसाठी कलाकारांची निवड करताना चॅनेलचे प्रतिनिधी, ईपी, दिग्दर्शक हे आपल्या पसंतीनुसार कास्टिंग करतात, असेही तो म्हणाला.




























































