महाराष्ट्रातून आता वाघ आणि बिबटे गुजरातला पळवले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिंधे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर येथील अनेक उद्योग गुजरात व अन्य राज्यांत पळवण्यात येत असतानाच आता राज्याची उपराजधानी नागपूरमधून वाघ आणि बिबटेही गुपचूपपणे गुजरातमधील जामनगरला पाठवण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधून शनिवार, 21 जानेवारीला रात्री चार वाघ आणि चार बिबटे गुजरातला पाठविण्यात आले. याची दोन दिवस कुणालाच माहिती नव्हती; परंतु आता ही बाब समोर आली असून वन्यजीवप्रेमींनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मानव आणि वन्यजीव संघर्ष रोखण्याचे कारण सांगून काही अधिकारी यावर बोलण्यास टाळाटाळ करत असल्याने संशय अधिकच बळावला आहे.

 काही दिवसांपूर्वी येथून हत्ती गुजरातला पाठविण्यात आले होते. त्यानंतर गेल्या बुधवार, 11 जानेवारीला ब्रह्मपुरी येथून रेस्क्यू केलेला एक वाघ आणि वाघिणीला बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठविण्यात आले होते. याची माहिती गोरेवाडा व्यवस्थापनाने प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना दिली होती. आता अचानक वाघ आणि बिबटे मोठय़ा संख्येने जामनगरला पाठविल्यानंतरही गोरेवाडा व्यवस्थापनाने प्रसारमाध्यमांना कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही.

‘साहेबराव’ला नेलेच नाही!

संजय गांधी उद्यानासाठी वाघाची जोडी रवाना करताना जामनगर (गुजरात) येथील एका मोठय़ा उद्योगपतीच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील काही अधिकाऱ्यांचे पथक गोरेवाडाला पोहोचले होते. पेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून ज्या वाघाच्या रवानगीसाठी मंजुरी देण्यात आली होती त्याच्याऐवजी हे पथक दुसऱ्याच वाघाला घेऊन गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, गुजरातच्या खासगी प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सूत्रांच्या मते प्राधिकरणाने खासगी प्राणिसंग्रहालयासाठी गोरेवाडाचा वाघ ‘साहेबराव’ला पाठविण्याची मंजुरी दिली होती, परंतु गुजरातची टीम साहेबरावला घेऊन गेली नाही. यामुळे पेंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याची चर्चा होत आहे.