
अखेरपर्यंत अटितटीच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने सहा धावा राखून यजमान इंग्लंडचा पराभव केला आहे. हा सामना जिंकत टीम इंडियाने ही मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. मोहम्मद सिराजने पाच विकेट तर प्रसिद्ध क्रिष्णाने चार विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
#INDvsENG | India beat England by 6 runs in the fifth Test of the Series, at The Oval, London.
The Anderson–Tendulkar Series ends with a tie (2-2) pic.twitter.com/e7mDG7lhPr
— ANI (@ANI) August 4, 2025
पहिल्या चार कसोटी सामन्यातील दोन सामने इंग्लंडने जिंकले होते, एक सामना टीम इंडियाने व एक सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकणे गरजेचेच होते. टीम इंडियासाठी करो की मरो असलेल्या या सामन्याचा टॉस इंग्लंडने जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला चांगला खेळ करता आला नाही. 224 धावात टीम इंडियाचे सर्व खेळाडून तंबूत परतले . त्यानंतर फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची देखील सारखीच परिस्थिती होती. इंग्लंडने दहा गडी गमावत 247 धावा केल्या व टीम इंडियावर 23 धावांची आघाडी घेतली.
त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाच्या संघाने यशस्वी जैस्वालच्या 118 धावांच्या जोरावर 396 धावांपर्यंच मजल गाठली. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 373 धावांचे लक्ष्य दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या संघाचे पहिले तीन फलंदाज शंभर धावांपर्यंत बाद झाले. मात्र त्यानंतर मैदानावर आलेल्या हॅरी ब्रुक व जॅकॉब बेथेल यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या नाकी नाऊ आणले. दोघांनी मिळून तब्बल 195 धावांची भागिदारी केली. इंग्लंडसाठी अगदी विजयाच्या टप्प्यात असतानाच आकाशदीपने हॅरी ब्रुकला माघारी पाठवले. त्यानंतरही जॅकॉब संघाला विजय मिळवून देईल अशी आशा होती. मात्र प्रसिद्धने त्याचा काटा काढत टीम इंडियाचा विजयाच्या दिशेचा मार्ग सुकर केला. त्यानंतर अवघ्या 35 धावात इंग्लडच्या तीन फलंदाजांना सिराजने बाद केले व सामना टीम इंडियाच्या नावे केला.