चर्मकारांचे 100 कोटींचे कर्ज माफ करावे! राष्ट्रीय चर्मकार संघाची राज्य सरकारकडे मागणी

राज्य सरकारच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार महामंडळामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी, कर्मचा-यांच्या 300 पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा असल्याने चर्मकार व्यावसायिकांची कामे रखडलेली आहेत. या रिक्त जागा तातडीने भराव्यात तसेच चर्मकार व्यावसायिकांनी महामंडळाकडून घेतलेले 100 कोटींपेक्षा अधिक रकमेचे कर्ज माफ करावे, अशी जोरदार मागणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी आमदार बाबूराव माने यांनी महामंडळाकडे केली आहे.

चर्मकार बांधवांचा व्यावसायिक स्तर उंचावण्यासाठी माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्मकार संघाच्या एका शिष्टमंडळाने नुकतेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक गोरडे यांची मुंबई कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाने एक सविस्तर निवेदन देऊन ही मागणी केली आहे. एकीकडे राज्य सरकार शेतकऱयांची कर्ज माफ करते. उद्योगपतींची करोडो रुपयांची कर्ज माफ केली जात आहे. दुसरीकडे मात्र काबाडकष्ट करून आपला चर्मउद्योग भरभराटीस आणण्याचा प्रयत्न करणारे चर्मकार व्यावसायिक हे अनेक वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत. या व्यावसायिकांची कर्जाच्या या विळख्यातून सुटका करण्यासाठी त्यांचे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे कर्ज माफ करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी बाबुराव माने यांनी केली. शिष्टमंडळात राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी, जगन्नाथ खाडे, विजय घासे, रावण गायकवाड, गणेश खिलारे, दीपक भोसले, अशोक देहरे, अमर शिंदे, दिलीप शिंदे, उत्तम शिखरे आदींसह राज्य पातळीवरील पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.