एका धावेने केला घात! गप्टीलच्या ओव्हर थ्रोमुळे सामन्याला कलाटणी

31

सामना ऑनलाईन । लंडन

पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडला बसला. मार्टीन गप्टीलने केलेल्या थ्रोवर श्रीलंकेचा पंच कुमार धर्मसेना याने इंग्लंडला सहा धावा देण्याचा निर्णय घेतला आणि तेथेच सामन्याला कलाटणी मिळाली. खरे तर यावेळी सहाऐवजी पाच धावा देण्याची गरज होती, पण तसे झाले नाही. एका धावेने न्यूझीलंडचा घात केला. माजी दिग्गज पंच व क्रिकेट नियमासंदर्भातील गटाचे सदस्य असलेल्या सायमन टॉफेल यांनी या नियमाबाबत खुलासा करतानाच मैदानातील पंचांच्या निर्णयावरही ताशेरे ओढले. जगभरातील क्रिकेटप्रेमी, समीक्षक यांनीही कुमार धर्मसेना व मराइस इरॅसमस या पंचांनी निर्णायक क्षणी केलेल्या चुकीबद्दल नाराजी व्यक्त केली.

नियमावर एक नजर
आयसीसीच्या नियमांमध्ये 19.8 कलमात ओव्हर थ्रो व खेळाडूंच्या कृतीने अतिरिक्त धावा देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आहेत. क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलून यष्टय़ांपर्यंत फेकेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस करणे गरजेचे असते. त्यानंतर ओव्हर थ्रोच्या धावा ग्राह्य धरल्या जातात.

प्रत्यक्षात काय घडले…
बेन स्टोक्स व अदिल रशीद हे अखेरच्या षटकात फलंदाजी करीत असताना खेळपट्टीवर अत्यंत महत्त्वाची घटना घडली. बेन स्टोक्सने मिडविकेटला मारलेला फटका मार्टीन गप्टीलकडे गेला. त्याने चेंडू उचलून फेकेपर्यंत बेन स्टोक्स व अदिल रशीद यांनी एकमेकांना क्रॉस केले नव्हते. यावेळी बेन स्टोक्स व अदिल रशीदने धावून काढलेल्या दोन आणि ओव्हर थ्रोमुळे मिळालेल्या चार अशा एकूण सहा धावा इंग्लंडला देण्यात आल्या. मात्र दुसरी धाव आयसीसीच्या नियमात बसत नाही. यावेळी धावून काढलेली एक धाव व ओव्हर थ्रोमुळे मिळालेल्या चार धावा अशा एकूण पाच धावा देणे ग्राह्य होते. शिवाय एक धाव दिली असती तर बेन स्टोक्सऐवजी अदिल रशीद फलंदाजीला आला असता. अशावेळी न्यूझीलंडला विजयाची संधी मिळाली असती.

आपली प्रतिक्रिया द्या