कसारा-आसनगाव मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे ‘मेगा’ हाल; रोज तीन तासांचा ब्लॉक

जुन्या ओव्हरहेड वायर बदलण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. यासाठी 53 दिवस दररोज तीन तास मेगाब्लॉक घेतला जात आहे. मात्र रेल्वेचे नियोजन नसल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे. आदल्या दिवशी पूर्वकल्पना न देता सकाळी ब्लॉकचे टाईमटेबल नोटीस बोर्डवर लावले जाते. अचानक लोकल फेल्या रद्द केल्या जात असल्याने चाकरमान्यांचे मेगाहाल होत आहेत.

कल्याण-कसारा मध्य रेल्वे मार्गावर 16 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबरपर्यंत कसारा ते आसनगाव स्थानकादरम्यान सकाळी 10.30 ते 1.30 तीन तासांचा ब्लॉक घेतला जाणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले होते. मात्र या ब्लॉकमध्ये नियमितता नाही. आठवड्यातील चार ते पाच दिवस वेगवेगळ्या वेळी ब्लॉक घेतला जातो. याची कोणतीही पूर्वकल्पना दिली जात नाही. किंवा आदल्या दिवशी उ‌द्घोषणाही केली जात नाही. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेला जाणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी, मेल एक्स्प्रेमधून येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी मुंबई मार्गावरील लोकल रद्द केल्या जात असल्याने अनेक प्रवाशांना मुंबईकडील बाजूच्या इच्छितस्थळी जाताना खासगी वाहनांचा पर्याय शोधून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, तर काहींना कसारा, उंबरमाळी, खर्डी, तानशेत व आटगाव स्थानकात तीन तास ताटकळत थांबावे लागत आहे. शिवाय नाशिक, सिन्नर, धुळे, अकोला, नगर येथून मुंबईत लोकलने जाणाऱ्या प्रवाशांना ब्लॉकची पूर्वकल्पना नसल्याने कसारा स्थानकात तीन तास ताटकळत राहावे लागते.

सकाळी बससेवा सुरू करा सकाळी अचानक घेत अस असलेल्या रेल्वेच्या ब्लॉकमुळे प्रवाशांची धावपळ होत आहे. या वेळेत कसारा-आसनगाव बससेवा चालू करावी. जेणेकरून बाहेरगावाहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे शैलेश राऊत आणि राजेश घनघाव यांनी प्रशासनाकडे केली आहे.