गिरणगावातली ‘चाळ’, ‘डबा’ ऑक्सफर्ड डिक्शनरीत, 384 हिंदुस्थानी इंग्रजी शब्दांचा नव्या आवृत्तीत समावेश

574

मुंबईचा गेल्या दोन-तीन दशकांमध्ये झपाटय़ाने विकास झाला. गिरणगावातील चाळींच्या जागी गगनचुंबी टॉवर्स उभे राहिले. कापड गिरण्या एकापाठोपाठ एक बंद झाल्याने डबेवाल्यांना आपला व्यवसाय खासगी कार्यालयांमध्ये वाढवणे भाग पडले. मात्र मुंबईचा इतिहास सांगणारी ‘चाळ’ आणि ‘डबा’ यांचा जागतिक पातळीवर गौरव झाला आहे. जगाला लाखो-करोडो शब्दांची माहिती देणाऱया ऑक्सफर्ड डिक्शनरीत चाळ, डबा यांच्यासह 384 हिंदुस्थानी शब्दांचा समावेश झाला आहे.
ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन नुकतेच झाले. नव्या आवृत्तीत एक हजारावर नव्या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात 384 हिंदुस्थानी इंग्रजी तर 26 हिंदी शब्द घेण्यात आले आहेत. बोलीभाषेत रोज नवनव्या शब्दांचा उगम होत असतो. त्यातील बरेच शब्द नंतर व्यवहारातही वापरले जातात. ऑक्सफर्ड डिक्शनरीत अशा शब्दांचा वेळोवेळी समावेश होत असतो.

नव्या आवृत्तीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 26 हिंदी शब्दांपैकी 24 हे छापील डिक्शनरीत तर चार शब्द डिजिटल आवृत्तीमध्ये घेण्यात आले आहेत अशी माहिती ऑक्सफर्डच्या शिक्षण विभागातील व्यवस्थापकीय संचालक फातिमा दादा यांनी दिला.

काही शब्द डिक्शनरीत पूर्वीपासूनच होते पण कालौघात त्यांचे उच्चार बदलत गेले. अशा शब्दांनाही डिक्शनरीत वाव मिळाला आहे. उदाहरणार्थ aunty हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीत होता पण आता त्या शब्दाचे हिंदुस्थानी इंग्रजी भाषेतील रूपांतर म्हणजेच auntie हेसुद्धा घेण्यात आले आहे.

ऑक्सफर्डच्या नव्या आवृत्तीमध्ये शब्दांचे अर्थ सहजसुलभ भाषेत आणि उदाहरणांसह देण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्या शब्दांच्या उगमाबद्दलही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे इंग्रजी शिकणाऱयांना योग्य शब्द योग्य ठिकाणी वापराण्याबाबत कल्पना येईल.

डिजिटल आवृत्तीतील नवे शब्द
करंट (विजेसाठी वापरला जातो तो), लूटर, लुटिंग, उपजिल्हा

असे आहेत छापील नवे शब्द…
चॅटबॉट, फेक न्यूज, मायक्रोप्लास्टिक, बसस्टँड, डीम्ड युनिव्हर्सिटी, एफआयआर, व्हेज, नॉनव्हेज, रिड्रेसल, टेम्पो, टय़ूबलाइट, व्हिडीओग्राफ

आपली प्रतिक्रिया द्या