
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढते आहे. कोरोनाच्या या दुसऱया लाटेत रुग्णांना मोठय़ा प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत आहे. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संघटना व दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे येताना दिसत आहेत. दिल्लीतील ‘माऊंट कार्मेला स्कूल’ या खासगी शाळेत कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॅफे सुरू करण्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत देशातील विविध राज्ये आणि शहरांत ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हा ऑक्सिजनच्या तुटवडा दूर करण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून केला जात आहे. परंतु दिवसेंदिवस वाढणाऱया रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधा अपुऱया पडू लागल्या आहेत. या संकटाच्यावेळी सामाजिक भावनेतून अनेक लोक देवदूताच्या रूपाने मदतीसाठी पुढे येत आहेत. ‘माऊंट कार्मेला स्कूल’ या शाळेतील चार वर्ग खोल्यांत वॉक इन ऑक्सिजन कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शंभर बेडचे कोविड सेंटर्स
‘माऊंट कार्मेला स्कूल’ या शाळेचे विश्वस्त विल्यम यांच्या वडिलांचे अलीकडेच कोरोनामुळे निधन झाले. कोरोनाकाळात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची होत असलेली फरफट त्यांनी स्वतः अनुभवली आहे. त्यामुळे सामाजिक भावनेतून ‘द विजय विल्यम्स’ या नावाने शंभर बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याशिवाय दिल्लीतील अन्य शाळांत अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही विल्यम्स यांनी चालवला आहे.
- ज्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे ते आवश्यकतेनुसार काही तास बसून ऑक्सिजन घेऊ शकतात.
- कॅफेमध्ये डॉक्टर उपस्थित असल्याने एखाद्या रुग्णास अन्य कोणत्या उपचारांची गरज भासल्यास सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
- एखाद्या रुग्णात तीव्र लक्षणे आढळल्यास त्यासाठी शाळेच्या आवारात असलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचार केले जातात.



























































