कोरोनाची पॉझिटिव्ह बातमी, ऑक्सिजन एक्प्रेस मुंबईत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक असलेल्या अतिरिक्त ऑक्सिजनची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. त्यानुसार गुजरातमधील हापा येथून रविवारी सायंकाळी 6 वाजता निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस आज दुपारी 11.25 वाजता कळंबोली स्थानकात पोहोचली. त्याचबरोबर राज्यात आज पाच लाख इतक्या विक्रमी संख्येने नागरिकांना लस देण्यात आली असून राज्यातील रेमडेसिवीरचा पुरवठाही सुरळीत होत आहे.

860 किमी प्रवास, 44 टन ऑक्सिजन

ऑक्सिजन एक्स्प्रेस 860 किमीचा प्रवास करून कळंबोलीत पोहोचली. हापा येथून विरमगाव, अहमदाबाद, वडोदरा, सूरत, वसई रोड आणि भिवंडी रोड मार्गे सुरक्षेच्या सर्व बाबी पाळून ही एक्स्प्रेस कळंबोली येथे पोहोचली. या मार्गे एक्स्प्रेसने 44 टन ऑक्सिजन वाहून आणला आहे. रेल्वेने आतापर्यंत मुंबई ते विझाग आणि विझाग ते नागपूर व नाशिक आणि लखनौ-बोकारो-लखनौ दरम्यान ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविली असून 25 एप्रिलपर्यंत 150 टन द्रव ऑक्सिजन वाहून नेले आहे. आणखी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवून देशाच्या विविध भागांतून त्याचे नियोजन केले जात आहे.

दीड कोटींचा टप्पा गाठणार

लसीकरणात महाराष्ट्र देशात सातत्याने अग्रस्थानी आहे. आतापर्यंत 1 कोटी 43 लाख 42 हजार 716 नागरिकांचे लसीकरण झाले असून त्यात आजची संख्या मिळविली तर सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास ही संख्या होत असून उद्याच्या लसीकरणानंतर महाराष्ट्र दीड कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा ओलांडेल, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

राज्य सरकार 61 कोटींच्या कोरोना औषधांची खरेदी करणार

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने 61 कोटी रुपयांच्या औषध खरेदीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. औषध खरेदी हाफकिन जैव मंडळ या सरकारी संस्थेमार्फत होणार आहे. त्यामध्ये रेमडेसिवीरच्या 6 लाख 60 हजार कुप्या असून एक कुपी सुमारे 700 रुपयांना खरेदी केली जाणार आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली. या पुरवठय़ामुळे रेमडेसिवीरचा तुटवडा दूर होणार आहे.

मुंबईत दिवसभरात 45 हजार व्यक्तींचे लसीकरण

मुंबई महापालिकेला रविवारी कोव्हिशिल्डच्या दीड लाख डोस आणि कोव्हॅक्सीनचे 8 हजार डोस मिळाल्यामुळे आज मुंबईत पालिका, राज्य, केंद्र आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरण सुरळीत सुरू होते. मात्र, 21 खासगी केंद्रे बंद होती. मुंबईकरांनी नेस्को कोरोना केंद्रावरील लसीकरण केंद्रावर पहाटेपासून गर्दी केली होती. सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हीशिल्डचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला. मात्र, कोव्हॅक्सीनचा केवळ दुसरा डोस देण्यात आला. मुंबईत आज दिवसभरात 45 हजार 326 जणांनी लस घेतली.

एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आतापर्यंतची विक्रमी नोंद आज केली असून सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांच्या पैकपटीने महाराष्ट्र पुढे असून आज राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक 6155 लसीकरण केंद्र होते. आज राज्याने लसीकरणात पाच लाखांचा टप्पा ओलांडल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले आहे.