
मुंबई आणि लाटा यांचा कायमचा संबंध आहे. एक लाट ओसरली की दुसऱया लाटेची तयारी करावी लागते. कोविडच्या संसर्गाच्या दुसऱया लाटेदरम्यान वैद्यकीय प्राणवायू (ऑक्सिजन) उपलब्धतेसाठी आपण सर्वांनी अक्षरशŠ युद्धजन्य स्थिती अनुभवली आहे. अशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी वैद्यकीय प्राणवायू उत्पादन प्रकल्प उभारून स्वयंपूर्णतेकडे नेण्याची मुंबई महापालिकेची वाटचाल अभिमानास्पद आहे. विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडांतून पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारले जात आहेत. अशा प्रकार सर्व एकत्र आलो तर कोणत्याही संकटावर निश्चित मात करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर, वांद्रे भाभा हॉस्पिटल, राजावाडी हॉस्पिटल, कूपर हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती संयंत्रांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले. यावेळी पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी.वेलरासू आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना काळात मुंबई मॉडेलचे जगभर कौतुक झाले. पण हे श्रेय माझे नसून प्रत्यक्ष काम करणाऱया आपल्या सर्वांचे आहे.
वातावरणातील हवा शोषून त्याद्वारे वैद्यकीय प्राणवायू निर्मिती करणाऱया (पीएसए) तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. कॉर्पेरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) माध्यमातून हे सर्व संयंत्र उपलब्ध झाले आहेत. त्यासाठी मेसर्स आरती इंडस्ट्रीज, मेसर्स घारडा केमिकल्स, मेसर्स बी. जी. शिर्पे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेड, मेसर्स सारेक्स फाऊंडेशन, मेसर्स अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, मेसर्स डी डेकोर होम फॅब्रिक्ज प्रा. लि. आणि मेसर्स मारवाह स्टील प्रा. लिमिटेड या सात दात्यांनी मिळून सीएसआर अंतर्गत हे संयंत्र उभारण्यासाठी महानगरपालिकेला सहकार्य केले आहे.
या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्यास जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव, यांत्रिकी व विद्युत प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांच्यासह विविध मान्यवर आणि संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.





























































