
गोपाळ पवार । मुरबाड
गाई-म्हशींमधून दुध काढण्यासाठी अनेक दुग्धव्यवसायीक व तबेलेवाले शासनाने प्रतिबंध घातलेल्या ‘आँक्सीटोसीन’ या इंजेक्शनचा सर्रास वापर करतात. त्यामुळे गाई-म्हशी यांना लगेच पान्हा येऊन ते दुध देतात. परंतु या इंजेक्शनचा वापर केल्याने त्या गाई-म्हशींसोबतच जे लोक हे दुध पितात त्यांच्या आरोग्यावर गंभीर व घातक परिणाम होताना दिसत असून जनावरांना हे इंजेक्शन देऊ नये व हे विषरूपी दुध न पिण्याचा सल्ला पशुवैद्यकीय अधिकारी देत आहेत.
अनेक दुग्ध व्यवसायीक व तबेलेवाले गाई व म्हशींमधून दुध काढण्यासाठी ‘आँक्सीटोसीन’ या इंजेक्शन चा सर्रासपणे वापर करतात. हे इंजेक्शन मुख्यतः महिलांची बाळंतपणातील प्रसुती सुखकर व्हावी यासाठी देतात. वैद्यकीय अधिका-यांच्या लेखी चिठ्ठी शिवाय हे इंजेक्शन देण्यास शासनाने औषध विक्रेत्यांना प्रतिबंध केला आहे. तरीसुद्धा अनेक औषधांच्या दुकानात हे इंजेक्शन सर्रास चोरून विकले जाते. काही तबेलेवाले नवजात वासरू किंवा पारडू हे जर नर जातीचे असल्यास त्यास मारून टाकले जाते. त्याची चामडी काढून त्यात भुसा किंवा गवत भरून पुन्हा तशाच प्रकारे शिवून घेतात. व गाई-म्हशींमधून दुध काढताना ते भुसा भरून बनवलेले वासरू किंवा पारडू समोर ठेऊन दुध काढतात. परंतु हा प्रयोग जास्त दिवस चालत नाही. म्हणून शासनाने प्रतिबंध केलेले व विशिष्ट औषधांच्या दुकानात सर्रास चोरून विकले जाणारे हे आँक्सीटोसीन इंजेक्शन जनावरांना टोचले जाते. यामुळे लगेच पान्हा फुटून दुधाळ जनावरे दुध देतात. परंतु या इंजेक्शनच्या वापरामुळे जनावरे लवकर म्हातारी होतात. त्यांची हाडे ठिसूळ होऊन त्यांना विविध प्रकारचे आजार जडतात. त्याचप्रमाणेा या इंजेक्शनचा वापर करून काढलेले दूध प्यायल्याने मनुष्याच्या आरोग्यावरही घातक परिणाम होतात.
मनुष्याच्या आरोग्यावर घातक परिणाम
गाई-म्हशींना ‘आँक्सीटोसीन ‘ इंजेक्शन देऊन दुध काढल्यानंतर ते पिणारी मुले मुली लवकर वयात येतात, शरिरातील कँल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होतात, स्त्री-पुरुष नपुंसकत्वाकडे वळतात, मुलांना कमी वयात दाढी मिशी येण्याचा संभव असतो, केस लवकर सफेद होतात, शरिराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, लहान मुलांना संधीवात दम्यासारख्या व्याधी जडतात.त्यामुळे दुग्धव्यवसायीकांनी या इंजेक्शन चा वापर टाळावा असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप धानके यांनी केले आहे. त्याचप्रमाणे गाईम्हशींना पान्हा येण्यासाठी लँक्टेनफोर्ट व मिल्कहर्ब मिल्काऊट यासारखी आयुर्वेदिक औषधे वापरून दुग्ध वाढ करावी. आपल्या पशुधनाबरोबरच मनुष्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करा असा सल्लाही डॉ.धानके यांनी दिला आहे.
भाजीपाला व गावठी दारूसाठी वापर
आँक्सीटोसीन हे इंजेक्शन पाण्यात टाकून त्यामध्ये भाजीपाला काहीवेळ बुडवून ठेवतात. त्यामुळे दिवसभर भाजीपाला हा टवटवीत राहतो म्हणूनही उपयोग करतात. त्याचप्रमाणे गावठी दारूच्या अड्ड्यावर सुद्धा या इंजेक्शन चा सर्रास वापर केला जायचा. गावठी दारूत हे इंजेक्शन टाकल्यास दारूची नशा जास्त वाढते. परंतु यामुळे शरीरावर घातक परिणाम होतो हे याचा वापर करणाऱ्याना माहित असूनही आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांचे जीवन धोक्यात टाकत आहेत.



























































