डेन्मार्क ओपन -सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकण्याचा पराक्रम करणारी हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तीन सेटपर्यंत चाललेल्या सामन्यात सिंधूने थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफामनला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सिंधूने 67 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-16, 12-21, 21-15 अशा सेटमध्ये बुसाननचा पराभव केला. ऑगस्ट महिन्यात ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक पटकावल्यानंतर सिंधूची ही पहिली स्पर्धा आहे. त्यानंतर सिंधूने ब्रेक घेतला होता आणि डेन्मार्क ओपनमधून खेळण्यास सुरुवात केली आहे.

यापूर्वीच्या सामन्यात सिंधूने टर्कीच्या नेस्लिहान यिगिटवर 21-12, 21-10 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला होता. त्यानंतर सिंधूची बुसानन ओंगबामरुंगफानशी सामना झाला. या स्पर्धेच्या सलामीलाच सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप या स्टार खेळाडूंचे आव्हान सलामीच्या फेरीतच संपले आहे.