
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आर्थिक संकटात सापडलेल्या एअर इंडियाला तारण्यासाठी केंद्र सरकारने 2100 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी कर्ज म्हणून दिला जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण सचिव आर. एन. चौबे यांनी दिली. एअर इंडियावर सुमारे 51 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. गेल्या मे महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाची 76 टक्के हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कुणीही ग्राहक पुढे आला नाही. बेलआऊट पॅकेज अंतर्गत एअर इंडियाला जून महिन्यापर्यंत सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळाले. 2012 मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने त्या पॅकेजची घोषणा केली होती. त्यानुसार अटी व शर्थींचे पालन केल्यास 2021 पर्यंत सरकारकडून एअर इंडियाला 30 हजार 231 कोटी रुपये मिळणार आहेत.
























































