
सामना प्रतिनिधी, मुंबई
पवई येथील आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी यंदाच्या कॅम्पस प्लेसमेंटमध्येही लाखोंची उड्डाणे घेतली. प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात एक हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये लाखोंच्या वेतनावर नोकऱ्या मिळाल्या. विविध कंपन्यांनी 1270 विद्यार्थ्यांना नोकऱयांच्या ऑफर्स दिल्या होत्या. त्यातील 1122 विद्यार्थ्यांनी त्या स्वीकारल्या. सर्वाधिक पॅकेज वार्षिक 1 कोटी 6 लाख 66 हजार रुपये परदेशातील नोकरीसाठी होते.
1 डिसेंबरला कॅम्पस प्लेसमेंटचा पहिला टप्पा सुरू झाला होता. तो 17 डिसेंबरपर्यंत सुरू होता. 361 कंपन्या त्यात सहभागी झाल्या होत्या. प्लेसमेंटमध्ये 1122 विद्यार्थ्यांना नोकऱया मिळण्याची आयआयटी मुंबईतील ही पहिलीच वेळ आहे. सर्वाधिक ऑफर्स या इंजिनीयरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातील कंपन्यांनी दिल्या. देशांतर्गत नोकऱयांसाठी प्रत्येकाला वार्षिक किमान 18 लाख तर कमाल 45 लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.
सर्वाधिक 27 ऑफर्स सॅमसंगकडून
सॅमसंग कंपनीने या प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक 27 ऑफर्स दिल्या. कोरिया, बंगळुरू, नोएडा आणि दिल्ली येथील सॅमसंगच्या शाखांमधील या ऑफर्स आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील तीन कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना 13 मोठय़ा ऑफर्स मिळाल्या. प्लेसमेंटच्या दुसऱ्या टप्प्यात हे आकडे वाढतील अशी अपेक्षा आहे.
क्षेत्र वार्षिक वेतन सर्वाधिक ऑफर्स देणाऱ्या कंपन्या
कन्सल्टिंग 13.28 लाख सरकारी कंपन्या (21)
इंजिनीयरिंग 18.50 लाख मायक्रॉन सेमीकंडक्टर (24)
फायनान्स 17.51 लाख गोल्डमॅन सॅच्स (17)
आयटी 21.29 लाख मायक्रोसॉफ्ट (19)
रिसर्च 16.13 लाख सॅमसंग (27)
तीन वर्षांत विद्यार्थ्यांना आलेल्या ऑफर्स
2016-17 1008
2017-18 1023
2018-19 1122
पहिल्या दोनच दिवसांत साडेचारशे ऑफर्स
प्लेसमेंटच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसातच सर्वाधिक ऑफर्स मिळाल्या. पहिल्या दिवशीच 200 ऑफर्स मिळाल्या. त्यातील 183 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मिळालेल्या 237 ऑफर्सपैकी 210 ऑफर्स विद्यार्थ्यांनी स्वीकारल्या. अमेरिका, जपान, नेदरलॅण्ड, सिंगापूर, तैवान आणि दक्षिण कोरियातील नोकऱ्यांच्या 89 ऑफर्स आयआयटीतील विद्यार्थ्यांना मिळाल्या.





























































