
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. देशभरात 131 मान्यवरांना पुरस्कार जाहीर झाले असून सर्वाधिक 15 पद्म पुरस्कारांवर महाराष्ट्राची मोहोर उमटली आहे. तमाशा कलेचा प्रथमच सर्वेच्च गौरव झाला असून तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांना ‘पद्मश्री’ने सन्मानित केले जाणार आहे. वारली संगीतकार भिकल्या लाडक्या धिंडा, कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीरंग लाड, प्रसिद्ध उद्योजक अशोक खाडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी जनार्दनपंत बोथे, वैद्यकीय संशोधनासाठी आर्मिदा फर्नांडिस आणि मुंबईकर क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘पद्म’ पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रसिद्धीपासून दूर राहून अनेक वर्षे निःस्पृहतेने काम करणाऱ्या कर्तृत्ववानांचा समावेश आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांतील व विविध क्षेत्रांतील मान्यवर यात आहेत. आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती, पर्यावरण, संगीत, क्रीडा, कला आदी क्षेत्रात काम करणाऱ्यांची निवड सरकारने केली आहे.
पद्मविभूषण
धर्मेंद्र (मरणोत्तर)
व्ही. एस. अच्युतानंदन (मरणोत्तर)
के. टी. थॉमस
एन. राजम
पी. नारायणन
पद्मभूषण
अलका याज्ञिक (महाराष्ट्र), पीयूष पांडे (मरणोत्तर) (महाराष्ट्र), उदय कोटक (महाराष्ट्र)
महाराष्ट्रातील पद्मश्री
रघुवीर तुकाराम खेडकर
अशोक खाडे
जनार्दन बोथे
आर्मिदा फर्नांडिस
भिकल्या लाडक्या धिंडा
श्रीरंग देवबा लाड
रोहित शर्मा
सतीश शहा (मरणोत्तर)
जुझेर वासी
आर. माधवन
सत्यनारायण नुवाल
शिबू सोरेन (झारखंड)
विजय अमृतराज (एनआरआय)
व्ही. के. मल्होत्रा (दिल्ली)
भगतसिंह कोश्यारी (उत्तराखंड)
के. पलानीसामी (तामीळनाडू)
मामुट्टी (केरळ)
डॉ. नोरी दत्तात्रयुडू (एनआरआय)
एस. के. एम. मैलनंदन (तामीळनाडू)
शतावधानी गणेश (कर्नाटक)
वेलापल्ली नटेसन (केरळ)
रसिकांची सेवा केली, त्याची पोचपावती मिळाली

तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना आज ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तमाशा लोककलावंताला मिळालेला हा पहिलाच ‘पद्म’ पुरस्कार आहे. पुरस्कार जाहीर होताच रघुवीर खेडकर भावुक झाले. ‘माझ्या सात पिढय़ांचा उद्धार झालाय. लोकांसाठी, समाजासाठी जे झटलो, त्याची पोचपावती मिळाल्याचा मला आनंद आहे. तमाशा लोककलेला हा पहिलाच ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मला मिळतोय हे माझं भाग्य आहे. हा पुरस्कार माझ्या आईवडिलांच्या आणि माझ्यावर प्रेम करणाऱया रसिक प्रेक्षकांचा आहे, असे खेडकर म्हणाले.
‘देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदाच ‘पद्म’ पुरस्कार हा तमाशा कलावंताला मिळालाय. आजचा दिवस सुवर्णदिन आहे. हा माझा नाही तर अवघ्या तमाशा क्षेत्राचा सन्मान आहे. येत्या काळात तरुण मंडळी तसेच जाणकार लोक तमाशाचा अभ्यास करतील. तमाशामध्ये फार मोठी ताकद आहे. मोबाईल, टीव्हीच्या युगात माणसं तमाशा कलावंतांकडे चांगल्या नजरेनं पाहायला लागली आहेत. जुना दृष्टिकोन बदलला आहे,’ अशी भावना रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केली.
सोंगाडय़ा ते ‘पद्मश्री’पर्यंतचा संघर्षमय प्रवास
रघुवीर खेडकर गेली पाच दशके तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत. तमाशा संस्कृती टिकवण्यात आणि राज्याबाहेर तिचा प्रसार करण्यात रघुवीर खेडकर यांनी मोलाचे योगदान दिले आहे. संगमनेरचे सुपुत्र असलेले खेडकर आजही गावखेडय़ात तमाशा सादर करत आहेत. ‘रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर तमाशा मंडळ’ असे त्यांच्या पथकाचे नाव आहे. तमाशा क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘तमाशा महर्षी’ म्हणून ओळखले जाते. ‘आई कांताबाई सातारकर यांच्याकडून मी कलेचे धडे गिरवले. तो वारसा मी जपतोय… आमचे खेळ आजही गावोगावी होतात. मी त्यात स्वतः सोंगाडय़ा साकारतो, ’ असे रघुवीर खेडकर म्हणाले.




























































