पागडीमुक्त मुंबईची मिंध्यांची घोषणा फसवी, आदित्य ठाकरे यांचा हल्ला

मिंधे-भाजप सरकारने केलेली पागडीमुक्त मुंबईची घोषणाही स्थानिकांना मुंबईबाहेर फेकण्यासाठी केलेली फसवी असल्याचा जोरदार हल्ला आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. या योजनेला बळी पडू नका, फसू नका, असे आवाहनही त्यांनी केले.

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या फसव्या घोषणांचा पर्दाफाश केला. ज्या माणसाने पक्ष चोरला तो माणूस मुंबईला पागडीमुक्त करण्याची घोषणा करीत आहे. खरं तर पागडीमुक्त मुंबईचा प्रश्न महाविकास आघाडी सरकारने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सोडवला होता. मात्र हा विषय कोर्टात गेल्यामुळे तांत्रिक तिढा निर्माण झाला आहे. आमची मागणी आहे की, भाडेकरूंना तुम्ही कायदेशीर संरक्षण द्या. ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा, कारण आता इमारत मोडकळीस आल्याचे सांगत जागा मालक पागडीत राहणाऱयांना बाहेर हक्काच्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे तुम्ही पुढाकार घेऊन कोर्टात सांगा की, म्हाडाच सक्षम प्राधिकरण आहे. पण सरकार काय करीत आहे, असा सवालही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकार असताना झालेल्या अधिवेशनात आम्ही 650 कोटी पोलीस हाऊसिंगसाठी वेगळे काढून ठेवले होते. काही पोलीस हाऊसिंग सुरूही केले होते. मात्र आता हा सगळा कार्यक्रम ठप्प पडला आहे. त्यामुळे सरकारने निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना मुंबईमध्येच त्याच कॅम्पमध्ये  किंवा त्याच परिसरात हक्काची घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. सरकारने केवळ वारंवार समित्या नेमून दिशाभूल करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

‘फेकनाथां’च्या घोषणाही फेकच!

आमची मागणी हीच होती की, ज्या उपकरप्राप्त, सेस किंवा पागडीवाल्या प्रॉपर्टी असतील त्यांना स्पष्टपणे एक ट्रिगर द्या की, बिल्डिंग मोडकळीस आली किंवा नसेल पण 60 वर्षांची बिल्डिंग झाली की पुनर्विकासाची पहिली संधी पहिली जागामालकाला आणि मग तिकडच्या भाडेकरूंना तुम्ही शक्य करून द्या. मात्र असे न होता गृहनिर्माण मंत्र्यांनी केलेली घोषणा ही फक्त जागामालक आणि बिल्डरसाठी होती. त्यामुळे पागडीमध्ये राहणाऱयांना मुंबईबाहेर घालवण्याचा डाव आहे. फेकनाथ मिंधेंच्या घोषणाही फेकच आहेत. कारण त्या ठिकाणी राहणाऱयांना आहे तितकीच जागा देणार आहेत. बिल्डरांना वाढीव एफएसआय, टीडीआर, कॉम्पेंसेटरी, इन्सेटिव्ह मिळणार, बेनिफिट मिळणार… म्हणजे तुम्ही नक्की कुणाचे सरकार आहात?

भाजप म्हणजे ‘बिल्डर’ जनता पार्टी

भाजप सरकारला खोटं बोलण्याची जुनी सवय आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये दिले नाहीत. शेतकऱयांना कर्जमुक्त केले नाही. कुठलीही मदत दिली नाही. आता पागडीमुक्त मुंबईच्या नावाखाली शहरात राहणाऱयांना मुंबईबाहेर घालवण्याचा डाव आहे, असा टोला लगावत ‘भाजप’ म्हणजे ‘बिल्डर जनता पार्टी’ आहे, असा जोरदार घणाघातही आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केला.