भावाने गोळ्या झेलल्या आहेत, आधी त्याला परत करा, मग खुशाल सामना खेळा; परमार कुटुंबियांचा मोदी सरकारवर संताप व्यक्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपले सौभाग्य गमावलेल्या माता भगिनी अजून त्या धक्क्यातून सावरल्या नाहीत. तोवरच मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडला आहे. रविवारी अबुधाबीमध्ये होणाऱ्या हिंदुस्थान पाकिस्तान सामन्याला देशभरातून सातत्याने विरोध होत आहे. आता पहलगामच्या हल्ल्यात पती (वडील) आणि मुलगा (भाऊ) गमावलेल्या परमार कुटुंबानेही मोदी सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. माझ्या भावाने गोळ्या झेलल्या आहेत, आधी त्याला परत करा; मग पाकिस्तानसोबत खुशाल सामना खेळा, असे म्हणत आपल्या वडिलांना आणि भावाला गमावलेल्या सावन परमारने सरकारला सुनावले आहे.

बलिदानाची काहीच किंमत नाही का? बहिष्कार टाका, मॅच बघू नका! तुमच्या भावना मेल्या आहेत का? पहलगामच्या हल्ल्यात कुंकू पुसले गेलेल्या दुर्दैवी विधवेचा आक्रोश

गेल्या सहा महिन्यांपूर्वी 22 एप्रिल, 2025 रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात अनेक निष्पाप जणांनी जीव गमावला. यामध्ये गुजरातमधील भावनगर येथील सुमित परमार आणि त्याचे वडील यतेश परमार यांचा समावेश होता. दरम्यान या क्रिकेट सामन्याविषयी कळताच यतेश यांचा मुलगा सावन परमार आणि पत्नी किरण यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध केलाय. एएनआयशी बोलताना सावन म्हणाला की, पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे व्यवहार नसावेत. कारण तो एक दहशतवादी देश आहे. जर तुम्हाला पाकिस्तानशी सामना खेळायचा असेल तर तो पहलगाममध्ये मारल्या गेलेल्या माझ्या १६ वर्षांच्या भावाला आधी परत द्या, असा आक्रोश य़ावेळी सावनने केला.

पती आणि मुलाला गमावलेल्या किरण यतिश परमार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. हा सामना होऊ नये, मी पंतप्रधान मोदींना विचारू इच्छिते की, जर ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, तर हा भारत-पाकिस्तान सामना का होत आहे?… मला संपूर्ण देशाला सांगायचय की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांना भेटा आणि ते किती दुःखी आहेत ते पहा. आमच्या जखमा अजूनही बऱ्या झालेल्या नाहीत…असे म्हणत किरण परमार यांनी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला अनेक लोकांनी विरोध केला आहे. यासंदर्भात रविवारी शिवसेनेच्या रणरागिणींतर्फे ‘माझं कुंकू माझा देश’ हे राज्यव्यापी आंदोलन केले जात असून महाराष्ट्राच्या घराघरातून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवणार आहेत.मोदींना त्यांच्या आश्वासनांची व सिंदूरची आठवण करून देण्यासाठी शिवसेनेने आंदोलनाची हाक दिली आहे.

शिवसेनेच्या रणरागिणींचे राज्यव्यापी आंदोलन, घराघरातून मोदींना पाठवणार सिंदूर! पहलगामच्या वेदनेचा विसर… हिंदुस्थान आज पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार