
पहलगाम हल्ल्यामागे (Pahalgam Attack) पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी असल्याची माहिती समोर आली आहे. दहशतवादाला खतपाणी घालून हिंदुस्थानला छळणाऱ्या पाकिस्तानला जन्माची अद्दल घडेल अशी कठोर कारवाई करा अशी मागणी हिंदुस्थानी नागरिक करत आहेत. हिंदुस्थानातील केंद्र सरकारला अशी कारवाई करण्यासाठी विरोधीपक्षांनी देखील मजबूत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संबंध हिंदुस्थान एक होऊन पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सज्ज आहे. जमिनी कारवाई आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी हिंदुस्थान विविध पाऊलं उचलंत आहे. हिंदुस्थानच्या या व्ह्यूह रचनेमुळे पाकिस्तानची कोंडी होणार असं चित्र आहे. अशातच इंग्रजी माध्यमांनी सूत्रांच्या आधाराने वृत्त प्रसिद्ध केलं आहे ज्यामुळे पाकिस्तानची यंत्रणा जवळपास आंधळी होणार अशी परिस्थिती आहे.
पाकिस्तानी लष्करी विमानांद्वारे वापरल्या जाणाऱ्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (GNSS) सिग्नलला रोखण्यासाठी हिंदुस्थानने मोठं पाऊल उचललं आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम सीमेवर अत्यंत प्रगत जॅमिंग सिस्टीम तैनात केल्या आहेत, ज्यामुळे पाकिस्तानची नेव्हिगेशन आणि स्ट्राइक क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे इंग्रजी माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. 30 एप्रिल ते 23 मे दरम्यान हिंदुस्थानने पाकिस्तानातून चालवण्यात येणाऱ्या विमानसेवांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या जॅमर सिस्टिममुळे हिंदुस्थानवर हल्ला किंवा प्रतिकार करण्याची, क्षेपणास्त्र डागण्याची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या हालचालीच त्यांना आता कळणार नाहीत. तसेच नक्की निशाणा कुठे लावायचा, कसा प्रतिकार करायचा हे पाकड्यांना कळणारच नाही आणि त्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे, असं या वृत्तात म्हटलं आहे.
GPS (अमेरिका), ग्लोनास (रशिया) आणि बेइडो (चीन) यासह अनेक उपग्रह-आधारित नेव्हिगेशन प्लॅटफॉर्मचा वापर पाकिस्तानी लष्करी विमानांद्वारे केला जातो. मात्र हिंदुस्थानी जॅमिंग सिस्टीम या सगळ्या यंत्रणांमध्ये व्यत्यय आणण्यास सक्षम आहे, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे इंग्रजी वृतसंकेतस्थळांवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
पाकिस्तानी कलाकारांचे Instagram Account हिंदुस्थानात बॅन, पहलगाम हल्ल्यानंतर सरकारचा निर्णय
कोणताही संभाव्य हल्ला किंवा घुसखोरी दरम्यान पाकिस्तान विविध देशांकडून घेतलेले तंत्रज्ञान वापरून हिंदुस्थानला छळण्याचा प्रयत्न करत असतो. पहलगाम हल्ल्यादरम्यान आणि त्यानंतर देखील सीमेवर घुसखोरीचे प्रयत्न झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. यात अशा तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते. त्यामुळे असे हल्ले आणि घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावण्यासाठी हिंदुस्थानने असे जॅमर अॅक्टिव्हेट करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. काही दिवसांनंतर, हिंदुस्थानने एक नोटम (वैमानीकांना सूचना) जारी करून 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत पाकिस्तानने नोंदणीकृत, चालवलेल्या किंवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या सर्व विमानांसाठी – व्यावसायिक विमान कंपन्या आणि लष्करी उड्डाणांसह – आपले हवाई क्षेत्र प्रतिबंधित केले.
हिंदुस्थानच्या संभाव्य प्रत्युत्तराच्या चिंतेमुळे पाकिस्तानी विमान कंपन्यांनी हिंदुस्थानी हवाई क्षेत्र टाळण्यासाठी मार्ग बदलण्यास सुरुवात केल्यानंतर लगेचच नोटम जारी करण्यात आला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आता हे निर्बंध औपचारिक झाल्यामुळे, पाकिस्तानी विमान कंपन्यांना क्वालालंपूरसारख्या आग्नेय आशियाई शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी चीनी किंवा श्रीलंकेच्या हवाई क्षेत्रावरून लांब आणि अत्यंत महागडे मार्ग स्वीकारावे लागणार आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.