
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईकची अंमलबजावणी केली आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील 16 युट्यूब चॅनल्सवर हिंदुस्थानात बंदी घातली होती. त्याचबरोबर काही पाकिस्तानी सेलिब्रेटी आणि खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर हिंदुस्थानने बंदी घातली आहे. मात्र, आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अधिकृत युट्यूब चॅनल सुद्धा हिंदुस्थानने ब्लॉक केलं आहे.
हिंदुस्थानने शुक्रवारी (2 मे 2025) पाकिस्तानी खेळाजू बाबर आझम, मोहम्मद आमिर, नसीम शाह, शाहीन आफ्रीदी, मोहम्मद रिजवान, हॅरिस राऊफ आणि इमाम उल हक यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंतप्रधानांच युट्यूब चॅनलही बंद करण्यात आलं आहे. या युट्यूब चॅनलवरून हिंदुस्थानी सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक आणि खोटे व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप हिंदुस्थानने केला आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तानातील काही प्रमुख न्यूज चॅनल्सवर सुद्धा हिंदुस्थानने बंदी आणली आहे.
हिंदुस्थानने बंदी घातलेल्या युट्यूब चॅनल्समध्ये न्यूज चॅनल डॉन, समा टीव्ही, एआरवाई न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जियो न्यूझ आणि सुनो न्यूज यांचा समावेश आहे. तसेच द पाकिस्तानी रेफरंन्स, समा स्पोर्ट्स, उजैर क्रिकेट आणि राजी नामा हे युट्यूब चॅनल्सपण हिंदुस्थानात बंद करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही पाकिस्तानी पत्रकारांच्या युट्यूब चॅनल्सवरही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये मुनीब फारूक, असमा शिराजी, इरशाद भट्टी आणि उमर चीमा या पत्रकारांचा समावेश आहे.