विधाने करताना सावधगिरी बाळगा, काँग्रेसकडून पक्ष नेत्यांसाठी सूचना जारी 

पहलगाम हल्ल्यावर वक्तव्य करण्याबाबत पक्ष नेत्यांसाठी काँग्रेसने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एक परिपत्रक जारी करून सर्व पदाधिकाऱयांना वक्तव्ये करताना सावधगिरी आणि शिस्त पाळण्यास सांगितले आहे. पक्षाच्या वतीने केवळ अधिकृत नेतेच विधाने देऊ शकतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.
जर कोणत्याही नेत्याने या सूचनांचे उल्लंघन केले तर त्यांच्याविरोधात कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. सर्व नेते, प्रवत्ते, पॅनलिस्ट आणि सोशल मीडिया हँडल केवळ 24 एप्रिल 2025 रोजी काँग्रेस कार्यकारणी समितीने मंजूर केलेल्या ठरावानुसारच विधाने करतील, असे परिपत्रकात म्हटले आहे.  दरम्यान, दहशतवादाविरोधात लढताना, निर्णय घेताना ध्रुवीकरणाचे राजकारण करू नका, असे जयराम रमेश म्हणाले. सध्याच्या घडीला टार्गेट दहशतवादीच असले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
तुम्हाला शत्रुत्वच हवे असेल तर आम्हीही तयार -फारुख अब्दुल्ला 
दहशतवाद आम्हाला मान्य नाही, हे मी अनेकदा बोललो आहे. दहशतवादामुळे दोन्ही देशांचे नुकसान होत आहे. आता वेळ आली आहे. जर तुम्हाला मैत्रीचे संबंध ठेवायचे असतील तर असले प्रकार करू नयेत. जर तुम्हाला शत्रुत्वच हवे असेल तर आम्हीही तयार आहोत, असा इशारा जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला दिला आहे. दरम्यान मोदी बेपत्ता असल्याबाबत काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवरून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पह्टोबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारले असता  ते इथेच दिल्लीत आहेत, अशी प्रतिक्रिया अब्दुल्ला यांनी दिली.