आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार बाळ ठाकूर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांजा तालुक्यातील भांबेड या गावचे सुपुत्र व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार तथा मुखपुष्टकार भालचंद्र तथा  बाळ ठाकूर यांचे वयाच्या 93  व्या वर्षी  त्यांच्या राहत्या घरी  तालुक्यातील भांबेड येथे आज सकाळी दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनाने लांजा तालुक्यासह चित्रनगरीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भालचंद्र शिवराम तथा बाळ ठाकूर यांनी 1948 साली मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबईमधून फाईन आर्टची पदवी घेतली. कोकणच्या लाल मातीत जन्मलेले व इथेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन मुसाकाजी बंदरातून बोटीने मुंबईला गेलेल्या बाळ ठाकूर यांच्या उपजत चित्रकलेला मुंबईने नाव मिळवून दिले व ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार ठरले.

वेगवेगळ्या नामवंत लेखकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठ त्यांनी तयार केली असून बाळ ठाकूर यांचे चित्र आपल्या पुस्तकात असणे हे साहित्यिकांना अभिमानास्पद वाटावे इतकी त्यांची प्रसिद्धी होती. चित्रकलेत इलस्ट्रेशन आणि रेखाटन हे दोन प्रकार असतात आणि या दोन्ही प्रकारात ते पारंगत होते. द. ग. गोडसे आणि प्रा. मधुकर जोमराज यांच्या चित्रशैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. जे. वोल्टर, थॉमसन, अयर्स, एच. एम. व्ही, इ.एम.आय. या जाहिरात संस्थेत त्यांनी काम केले होते. तर रहस्यरंजन, ललित, मौज, साहित्य, सत्यकथा आदी अंकासाठी त्यांनी चित्र काढली होती तसेच लक्ष्मीबाई टिळक, बालकवी, बा. ब. बोरकर तसेच त्याकाळच्या सर्व साहित्यिक यांची व्यक्तिचित्र त्यांनी काढली होती मात्र त्यांनी उभ्या आयुष्यात राष्ट्रविरोधी साहित्य अथवा चित्र कधीही काढली नाहीत.

वार्धक्यामुळे ते सध्या त्यांच्या मूळगावी भांबेड या ठिकाणी होते मात्र ते कुणाच्याही संपर्कात फारसे येत नव्हते. त्यांच्या पश्चात मुलगे, सुना नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचा अंत्यविधी भांबेड येथेच करण्यात आला. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.