पाजपंढरी नागरी वस्ती समोरच समुद्राच्या लाटांचे तांडव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाजपंढरी गावातील नागरी वस्ती समोरच समुद्राच्या उसळणाऱ्या महाकाय लाटांच्या तांडवनृत्याचे पाणी नागरी वस्तीमध्ये घुसल्याने वस्तीला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे येथील नागरीवस्तीच्या संरक्षणासाठी खास प्राधान्यक्रमाने संरक्षक भिंत बांधणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

दापोली तालूक्यातील पाजपंढरी हे गाव मच्छिमार दर्यावर्दी कोळी समाज वस्तीचे गाव असून संपूर्ण पाजपंढरी या गावाची वस्ती समुद्राच्या काठावरच वसलेली आहे. समुद्रातील बदलाने अथवा जेव्हा वादळसदृष्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा समुद्राच्या पाण्याला येणाऱ्या उधाणाच्या भरतीच्या लाटांचे पाणी पाजपंढरी येथील नागरी वस्तीत शिरत असल्याने अगदी समुद्राच्या काठावरच वसलेल्या वस्तीतील रहीवाशांचे खुपच नुकसान होत असते.

मासेमारी व्यवसाय करणारे दर्यावर्दी लोक असल्याने ते अगदी पूर्वापार समुद्राच्या काठावरच राहत आलेले आहेत. भिती न आंम्हा मुळी ही गड गडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानी संकटाला जबाब देती जिभा तशाच प्रकारे कितीही वादळ वारा येवू दे अथवा अस्मानी संकटाच्या लाटा उसळूदेत तरी सुध्दा आंम्ही मच्छिमार दर्यावर्दी जमातीचे लोक आहोत. छत्रपती शिवाजी महाराजाच्या आरमारातील मावळयांचे वशंज आहोत. त्यामुळे आम्हाला याची भिती नाही असे येथील लोक छातीठोकपणे सांगत असले तरी या ठिकाणी त्यांच्या सुरक्षिततेसाठी समुद्राच्या काठावर नागरिवस्तीला संरक्षण म्हणून संरक्षक भिंत उभारली तर समुद्रातील उधानाच्या उसळणा-या लाटांपासून त्यांचे संरक्षण होईल.

बिपरजाॅय चक्रीवादळाचा महाराष्ट्राला बसणारा धोका टळला असला तरी या चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. कोकणातल्या किनारपट्टी भागामध्ये बिपरजाॅय चक्रीवादळाचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असून लाटांचे तांडव सुरू आहे. समुद्र खवळला असला तरी मात्र पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. उसळणाऱ्या लाटा आणि घोंगावणारे वारे यामुळे अनेकांच्या मालमत्तांचे किरकोल का होईना पण नुकसान झाले आहे. या सा-या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महसुल प्रशासनासह पोलिस प्रशासन चांगलेच अर्लट झाले असून समुद्र किनारपट्टीवरील घडामोंडीवर त्यांचे बारीक लक्ष आहे.