
हिंदुस्थान ‘अ’ संघाने साखळीतील तिन्ही सामने धावांचा पाठलाग करून जिंकले, पाकिस्तान ‘अ’ संघाचाही दारुण पराभव केला होता. पण अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाने सपशेल मात खाल्ली. पाकिस्तानच्या 353 धावांच्या आव्हानापुढे हिंदुस्थानचा युवा संघ 224 धावांतच कोसळला आणि पाकिस्तान ‘अ’ संघाने 128 धावांच्या दणदणीत विजयासह एसीसी इमर्जिंग आशिया कप जिंकला.
हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाचे एकापेक्षा एक स्टार खेळाडू नेमके अंतिम झुंजीत अपयशी ठरले. त्यांना पाकिस्तानचे 353 धावांचे आव्हानच पेलवले नाही. हिंदुस्थानला साई सुदर्शन आणि अभिषेक शर्माने 64 धावांची सलामी दिली, पण ही जोडी फुटल्यानंतर अभिषेक शर्माचा अपवाद वगळता एकही फलंदाज पाकिस्तानी आक्रमणापुढे टिकला नाही. त्यामुळे हिंदुस्थानने अभिषेक शर्माची विकेट गमावल्यानंतर सामनाही गमावला होता. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात हिंदुस्थानच्या ‘अ’ संघाचे युवा 40 षटकांतच धारातीर्थी पडले आणि पाकिस्तानने अपेक्षेपेक्षा सहज आणि सोप्पा विजय मिळविला. पाकिस्तानचा तय्यब ताहिर सामनावीर ठरला तर 11 विकेट घेणाऱ्या निशांत सिंधूने मालिकावीराचा मान मिळवला.
तत्पूर्वी दोन खणखणीत शतकी भागीदाऱ्या आणि तय्यब ताहिरचे 71 चेंडूंतील 108 धावांचे झंझावाती शतकाने पाकिस्तान ‘अ’ संघाला 50 षटकांत 8 बाद 352 असा धावांचा डोंगर उभारून दिला.
साखळीतील तिन्ही सामन्यांत धावांचा यशस्वी पाठलाग करणाऱ्या हिंदुस्थान ‘अ’ संघाने आज नाणेफेक जिंकली आणि आपल्या पाठलागाचा यशस्वी सिलसिला पाहून कर्णधार यश धुलने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण हिंदुस्थानी कर्णधाराचा हा निर्णय पाकिस्तानी सलामीवीर सईम अयुब आणि साहिबजादा फरहानने हाणून पाडला. दोघांनी दमदार आणि जोरदार खेळ करीत 17.2 षटकांत 121 धावांची सलामी दिली. हीच सलामी पाकिस्तानच्या डावाला स्फूर्तिदायक ठरली. अयुब (59), साहिबजादा (65) यांची जोडी फुटल्यानंतर रियान परागने आपल्या सलग चेंडूंवर ओमैर युसूफ आणि कासिम अक्रम यांनी बाद करत पाकिस्तानची 2 बाद 183 वरून 4 बाद 183 अशी अवस्था केली आणि त्यानंतर सिंधूने कर्णधार मोहम्मद हारिसलाही बाद करून 5 बाद 187 अशी घसरगुंडी उडवली.
29 षटकांत 190 अशी अवस्थेत असलेल्या पाकिस्तानच्या डावाला तय्यब ताहिरच्या घणाघाताने चार चाँद लावले. त्याने मुबासिर खानच्या साथीने 15 षटकांत 126 धावांची जबरदस्त भागी रचत हिंदुस्थानी गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. ताहिरने 71 चेंडूंत 12 चौकार आणि 4 षटकार खेचत 108 धावा चोपल्या आणि संघाला त्रिशतकही गाठून दिले. ताहिर बाद झाल्यानंतर शेवटच्या 5 षटकांत पाकिस्तानच्या तळाच्या फलंदाजांनी केवळ 39 धावा काढत पाकिस्तानला 352 हा आकडा गाठून दिला. हिंदुस्थानकडून राजवर्धन हंगर्गेकर आणि रियान परागने प्रत्येकी दोन विकेट टिपले.





























































