
पाकिस्तानी सैन्याने अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर क्षेपणास्त्र डागली होती, अशी धक्कादायक माहिती हिंदुस्थानी लष्कराने दिली आहे. तसेच ही क्षेपणास्त्र ड्रोन्स हिंदुस्थानच्या हवाई संरक्षण प्रणालीने पंजाबमध्ये हाणून पाडली तसेच त्यांचे अवशेषही पुराव्याखातर दाखवले.
‘ऑपरेशन सिंदूर’बाबत हिंदुस्थानी लष्कराने आणखी एक नवा व्हिडीओ जारी केला असून त्यात पाकिस्तानकडून डागण्यात आलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्रs कशी हाणून पाडली याबाबत दाखवले आहे. वेस्टर्न कमांडने हा व्हिडीओ पोस्ट केला असून ‘आम्ही जमिनीपासून आकाशापर्यंत संरक्षण केले’ असे त्यात लिहिले आहे. लष्करप्रमुख उकेंद्र द्विवेदी यांनी राजस्थानच्या लौंगेवाला येथील सीमावर्ती परिसराचा दौरा केला. यावेळी त्यांनी तिन्ही दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईचा आढावा घेतला.
जम्मूत 30 ठिकाणी शाळा उघडल्या
जम्मूत सीमेवरील 30 ठिकाणी शाळा पुन्हा सुरू झाल्या असून परिस्थिती सामान्य आहे. शस्त्रसंधीनंतर जवळपास 12 दिवस शाळा बंद होत्या. त्यानंतर पूंछ, राजौरी, जम्मू, सांबा आणि कठुआ जिह्यात एलओसी आणि सीमेवरील जवळपास 30 ठिकाणी शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या.
युसूफ पठाण यांचा शिष्टमंडळात सहभागी होण्यास नकार
तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा हिंदुस्थानचा संदेश जगभरात पोहोचवण्यासाठी जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळासोबत जाण्यास नकार दिला आहे, मात्र शिष्टमंडळासोबत तृणमूलचा कोण प्रतिनिधी जाणार हे पक्ष नेतृत्व ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युसूफ पठाण यांचे नाव जनता दल युनायटेडचे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात होते. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूरला जाणार आहे.