T20 World Cup – विजय मिळवूनही पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर; श्रीलंकेच्या खेळीने न्यूझीलंडचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानचा प्रवास अत्यंत नाट्यमयरीत्या संपला आहे. शनिवारी झालेल्या सुपर-८ च्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ५ धावांनी पराभव केला खरा, पण उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आवश्यक असलेले समीकरण ते पूर्ण करू शकले नाहीत. परिणामी ग्रुप-२ मधून इंग्लंडसोबत न्यूझीलंडने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.

काय होते समीकरण?

पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी केवळ विजय पुरेसा नव्हता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २१२ धावांचा डोंगर उभा केला होता. न्यूझीलंडला धावगतीत मागे टाकण्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेला १४७ धावांच्या आत रोखणे आवश्यक होते. मात्र, श्रीलंकेने १४८ धावांचा टप्पा ओलांडताच पाकिस्तानचे स्पर्धेतील आव्हान अधिकृतपणे संपुष्टात आले.

पाकिस्तानची फलंदाजी

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात वादळी झाली. सलामीवीर साहिबजादा फरहानने शानदार शतक (६० चेंडूत १०० धावा) ठोकले, तर फखर जमानने ८४ धावांची वेगवान खेळी केली. या दोघांनी १७६ धावांची विक्रमी सलामी दिली. मात्र, अखेरच्या षटकांत पाकिस्तानने घसरगुंडी अनुभवली आणि २० षटकांत ८ बाद २१२ धावा केल्या.

पुढे २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची स्थिती एकवेळ ५ बाद १०१ अशी बिकट होती. पण कर्णधार दासून शनाका (७६)* आणि पवन रथनायके (५८) यांनी झंझावाती फलंदाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाम फोडला. श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद २०७ धावांपर्यंत मजल मारली.

शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी २८ धावांची गरज होती. शाहीन आफ्रिदीच्या पहिल्या चार चेंडूंवर शनाकाने ४, ६, ६, ६ असे एकूण २२ धावा वसूल केल्या. शेवटच्या दोन चेंडूंवर ६ धावा हव्या असताना शाहीनने पुनरागमन केले आणि पाकिस्तानला ५ धावांनी विजय मिळवून दिला. जरी सामना जिंकला असला, तरी श्रीलंकेने १४७ धावांचा टप्पा पार केल्यामुळे पाकिस्तानचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न भंगले.

या विजयानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे समान ३ गुण झाले, परंतु सरस धावगतीच्या (NRR) जोरावर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. या ग्रुपमधून इंग्लंडने अव्वल स्थान पटकावले आहे.