
T-20 वर्ल्ड कप मधील पाकिस्तान संघाच्या सुमार कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) एक निर्णय घेतला आहे. आयसीसी T-20 वर्ल्ड कप मधून पाकिस्तानचा संघ लवकर बाहेर पडल्यामुळे पीसीबीने खेळाडूंना आर्थिक दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला असून, उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
सलमान अली आगाच्या नेतृत्वाखाली खेळणारा पाकिस्तानचा संघ स्पर्धेच्या ‘सुपर ८’ टप्प्यातून बाहेर पडला. २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला १४७ धावांच्या आत रोखण्यात पाकिस्तानला अपयश आले, ज्यामुळे धावगतीच्या (Net Run Rate) बाबतीत ते न्यूझीलंडच्या पुढे जाऊ शकले नाहीत आणि त्यांचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले. सलग चौथ्या आयसीसी स्पर्धेत पाकिस्तानला अंतिम चारमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.
यानंतर क्रिकेटच्या संरचनेत किंवा प्रशासनात कोणतेही बदल जाहीर करण्याऐवजी, पीसीबीने प्रत्येक खेळाडूला ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा (PKR) दंड ठोठावला आहे. ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या पाकिस्तानी वृत्तवाहिनीने दिलेल्या अहवालानुसार, हा निर्णय पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर घेण्यात आला असला तरी, १५ फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानकडून झालेल्या पराभवानंतरच दंड लावण्याची तयारी सुरू झाली होती.
सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, बोर्डाने आर्थिक सवलतींबाबत आता कडक भूमिका घेतली असून भविष्यातील आर्थिक लाभ केवळ कामगिरीवर अवलंबून असतील. संपूर्ण स्पर्धा श्रीलंकेत खेळवली गेली, जिथली परिस्थिती पाकिस्तानसाठी अनुकूल मानली जात होती.
‘अधिकारी आणि बोर्डाने खेळाडूंना स्पष्टपणे सांगितले आहे की आतापर्यंत खूप लाड झाले—यापुढे आर्थिक लाभ फक्त चांगल्या कामगिरीनंतरच मिळतील’, असे या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर पीसीबीकडून अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.
पाकिस्तानने साखळी फेरीत नामिबियाचा पराभव करून ‘सुपर ८’ मध्ये प्रवेश केला होता. त्यांचा सुपर ८ मधील न्यूझीलंडविरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर इंग्लंडकडून झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानचे भवितव्य इतर निकालांवर अवलंबून होते. इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या आशा जिवंत राहिल्या होत्या, मात्र श्रीलंकेविरुद्धचा विजय नेट रन रेट सुधारण्यासाठी पुरेसा ठरला नाही. अखेर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आले.
माजी कर्णधार बाबर आझम, विद्यमान कर्णधार सलमान अली आगा, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद नवाज यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंवर टीकेची झोड उठली आहे. मायदेशी परतल्यानंतर सलमान अली आगा कर्णधारपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
pcb fines pakistan players 50 lakhs after t20 world cup exit
pakistan cricket board imposes 50 lakh pkr fine on each player after early exit from t20 world cup super 8 stage. captain salman ali agha likely to quit. news on saamana.
Keywords: saamana, samana, samna, daily saamana, सामना, pcb fine pakistani players, t20 world cup 2026, salman ali agha, babar azam, cricket news in marathi, pakistan vs sri lanka super 8.
























































