पाकिस्तानात दरवर्षी हजाराहून अधिक हिंदू मुलींचे जबरदस्तीने होतात निकाह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिनिव्हा- संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या 47व्या अधिवेशनात हिंदुस्थानने शेजारील पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत हल्लाबोल केला. जिनिव्हा येथील परिषदेत बोलताना हिंदुस्थानचे प्रथम सचिव पवन बाढे यांनी पाकिस्तानात हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढा वाचला.

पाकिस्तानचे सरकार देशातील हिंदू, शिख, ख्रिश्चन, अहमदीया या अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करीत आहे. पाकिस्तानात दरवर्षी हजारो मुलींचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने अथवा बलात्कार करून धर्मांतरण केल्यावर मुस्लिमांशी निकाह केले जातात. जबरदस्तीने धर्मांतरण करणे ही पाकिस्तानात दररोज सर्रास घडणारी घटना आहे.

पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची मंदिरे, पूजास्थळे जाळली जातात. त्यांच्यावर हल्ले करून पुरातन स्थळांची तोडफोड केली जाते. बहुसंख्याकांकडून अल्पसंख्याकांचा राजरोस छळ केला जातो, असे पवन बाढे यांनी सांगितले.

पाकिस्तानात सिंधी हा सर्वांत मोठा वांशिक अल्पसंख्याक गट आहे. त्यापाठोपाठ पश्तुन, मोहाजीर आणि बलुची यांची संख्या आहे. पाकिस्तानात सर्वांत मोठा अल्पसंख्याक धार्मिक गट हिंदूंचा आहे. त्यापाठोपाठ ख्रिश्चन, अहमदीया, शिया, इस्माईल, बोहरा, पारसी आणि शीख यांची संख्या आहे.

इम्नान खान सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकारांच्या हत्या केल्या जातात. पाकिस्तानची भूमी बेपत्ता होणाऱ्यांची भूमी बनली आहे. राजकीय कार्यकर्ते, विद्यार्थी, पत्रकार, मानवी हक्क संरक्षक व्यक्तीस अल्पसंख्याक कार्यकर्ते यांच्या दिवसाढवळ्या हत्या होतात. पत्रकारांचे अपहरण करून धमक्या देऊन कायमचे शांत केले जाते, असे बाढे यांनी भाषणात सांगितले.