
पाकिस्तान हॉकी संघामध्ये एक मोठा वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PHF) संघाचा कर्णधार अम्माद शकील बटवर दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे.आम्हाला भांडी घासायला भाग पाडले, असे वक्तव्य त्याने केले होते. ते वक्तव्य त्याच्या अंगलट आले असून त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तसेच आता हा वाद वाढत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान ही घटना उघडकीस आली. तिथे संघाला मैदानावरील खराब कामगिरी आणि मैदानाबाहेरील रोषाचा सामना करावा लागला. पाकिस्तान संघाचा ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीकडून पराभव झाला. मात्र, खेळाडूंनी केलेल्या कथित गैरव्यवहार चव्हाट्यावर आले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंनी स्वयंपाकघर स्वच्छ केल्याचा आणि भांडी धुण्याचा आरोप केल्याबद्दल पाकिस्तान हॉकी संघाच्या कर्णधारावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. खराब व्यवस्था, विमानतळावर तासनतास अडकून राहणे आणि हॉटेलमधील वाद यामुळे हा मुद्दा वाढला. वाद वाढत असताना, फेडरेशनच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आणि चौकशीची मागणी सुरू झाली.
होबार्टला रवाना होण्यापूर्वी संघ सुमारे १२-१५ तास सिडनी विमानतळावर अडकला होता. हॉटेल बुकिंग रद्द झाल्यामुळे खेळाडूंना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला आणि त्यांना तात्पुरत्या निवासस्थानात वेळ घालवावा लागला. लाहोरला परतल्यानंतर, अम्माद बटने फेडरेशनवर तीव्र हल्ला चढवला. त्याने दावा केला की ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान खेळाडूंना स्वयंपाकघर स्वच्छ करण्यास आणि भांडी धुण्यास भाग पाडले गेले. तो म्हणाला की संघाने पाठवलेले व्हिडिओ खरे होते, परंतु नंतर सामान्य वातावरण निर्माण करण्यासाठी दबाव आणला गेला.
फेडरेशनने हे आरोप अनुशासनहीन मानले आणि कर्णधारावर दोन वर्षांची बंदी घातली. पीएचएफचे म्हणणे आहे की बोर्डावर सार्वजनिकरित्या आरोप केल्याने संघटनेची प्रतिमा खराब झाली. प्रकरण वाढत असताना, पीएचएफ अध्यक्ष तारिक बुगती यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तान क्रीडा मंडळाने अर्जेंटिना दौऱ्याशी संबंधित हॉटेलच्या देयकांना विलंब लावला होता, ज्यामुळे व्यवस्थेवर परिणाम झाला.
बुगती यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना गैरव्यवस्थापनाचे सत्य उघड करण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची विनंती केली. पाकिस्तान क्रीडा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की संपूर्ण घटनेचा अहवाल तयार केला जात आहे. या वादामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान हॉकीसमोरील प्रशासकीय आव्हाने आणि संसाधनांची कमतरता अधोरेखित झाली आहे. त्यामुळे आता हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत.























































