इस्लामाबादमधील मशिदीत नमाज पठणादरम्यान स्फोट, 15 जणांचा मृत्यू तर 60हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शुक्रवारी भीषण बॉम्बस्फोटाने हादरली आहे. शहरातील प्रसिद्ध कासर-ए-खादीजातुल कुब्रा या ग्रँड मशिदीत नमाज पठण सुरू असताना हा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक तपासात हा आत्मघातकी हल्ला असल्याचे समोर आले असून, या घटनेचे अत्यंत भयानक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हिडिओ फुटेजमध्ये स्फोटानंतर नागरिकांची पळापळ होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तारलाई परिसरातील ज्या मशिदीमध्ये हा हल्ला झाला, ती एक प्रसिद्ध शिया मशिद म्हणून ओळखली जाते. पाकिस्तानमध्ये साधारण दोन कोटी शिया समुदायाची लोकसंख्या असून, एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण दहा ते बारा टक्के इतके आहे. या स्फोटाची भीषणता लक्षात घेता प्रशासनाने संपूर्ण इस्लामाबादमध्ये तातडीने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे मोठे पथक आणि बचावकार्य पथके घटनास्थळी दाखल झाली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नोव्हेंबर 2025 नंतर इस्लामाबादमधील हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये इस्लामाबाद न्यायालयाबाहेर झालेल्या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 36 जण जखमी झाले होते. या ताज्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.