सरफराज खान ऍण्ड कंपनीला हवाय विजय, अफगाणिस्तानसमोर पाकिस्तानचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लीडस्

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड कपमधल्या साखळी फेरीचा अंतिम टप्पा सुरू झालाय. ऑस्ट्रेलियासह हिंदुस्थान व न्यूझीलंड या संघांचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. चौथ्या स्थानावर कोणता संघ येईल या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यजमान इंग्लंड, बांगलादेश यांच्यासह पाकिस्तानलाही अंतिम चारमध्ये पोहोचण्याची संधी आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा संघ उद्या अफगाणिस्तानला भिडणार आहे. यावेळी सरफराज खान ऍण्ड कंपनीला स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी विजय हवाच आहे. अफगाणिस्तानला सात सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्याकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का मिळाल्यास 1992 च्या विजेत्यांचा पाय खोलात जाऊ शकतो.

पहिल्या स्थानासाठी रस्सीखेच

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या लंडन येथे लढत रंगेल. यावेळी पहिल्या स्थानासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस लागेल. ऑस्ट्रेलियन संघ सहा विजयांसह 12 गुणांनिशी पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंडचा संघ पाच विजयांसह 11 गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. न्यूझीलंडने उद्याची लढत जिंकल्यास ते 13 गुणांसह पहिल्या स्थानावर जातील आणि त्यांचे सेमी फायनलचे तिकीटही बुक होईल.

बाबर, हॅरीसवर पुन्हा मदार

पाकिस्तानच्या संघाने इंग्लंडला पराभवाचा ‘दणका’ दिल्यानंतर स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडलाही हरवत आपले आव्हान कायम राखले, पण उर्वरित दोन लढतींमध्ये त्यांना विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे. अफगाणिस्तान व बांगलादेश या संघांचे आव्हान सोप्पे असले तरी पाकिस्तानला गाफील राहून चालणार नाही. बाबर आझम, हॅरीस सोहेल या फलंदाजांवर पुन्हा त्यांची मदार असेल. तसेच फखर व इमाम या सलामीवीरांकडून दमदार सुरुवातीची अपेक्षा असेल.

आजच्या लढती

पाकिस्तान वि. अफगाणिस्तान

लीडस्, दुपारी 3 वाजता

ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड

लंडन, सायंकाळी 6 वाजता