
पाकिस्तान कश्मीरच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. जम्मू-कश्मीरचा वाद येथील जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे. जम्मू-कश्मीर वादाचे समाधान संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसारच होऊ शकते… असे बरळतानाच कश्मीर एक दिवस नक्की पाकिस्तानात येणार… असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ बरळले.
पाकव्याप्त कश्मीरच्या विधानसभेत भाषण करताना शाहबाज शरीफ यांनी सवयीप्रमाणे जम्मू-कश्मीरच्या विषयावरून आग ओकली. पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनता कश्मिरी जनतेच्या पाठीशी आहे, असे सांगतानाच शाहबाज शरीफ यांनी कश्मीर म्हणजे पाकिस्तानची जीवनवाहिनी असल्याचे म्हटले. पाकिस्तानला शांतता हवी आहे, अशी मखलाशी करताना शरीफ यांनी ही शांतता न्यायाच्या माध्यमातूनच शक्य असल्याचे तारे तोडले.





























































