हिंदु्स्थानला आर्थिक फटका देण्याचा पाकड्यांचा डाव

1026

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. नोटबंदीमुळे दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणे कठिण झाल्याने पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानात चलनात असणाऱ्या नकली नोटा छापल्या आहेत. या नोटांची तस्करी करुन हिंदुस्थानला आर्थिक फटका देण्याबरोबरच दहशतवाद्यांना पोसण्याचा डाव पाकिस्तानने आखला आहे.

या नकली नोटा लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटनांपर्यंत पोहचवल्या जात आहेत. 2016 सालापासूनच पाकिस्तानने हिंदुस्थानमध्ये नकली नोटा पाठवण्यासाठी जाळे विणले असून यासाठी पाकिस्तान कूटनितीचा वापर करत आहे. नेपाळ, बांग्लादेश आणि इतर देशांच्या माध्यमाने या नकली नोटा हिंदुस्थानात पोहचवल्या जात असल्याचा खळबळजनक दावा एका ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याने केला आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय या नोटा छापण्याचे काम करत आहे. आधी या नोटांची फोटोकॉपी केली जायची पण आता मात्र ही नकली नोट हुबेहुब नोटेसारखी कशी दिसेल याची विशेष काळजी आयएसआय घेत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नेपाळ विमानतळावरुन डी कंपनीशी संबंधित युनुस अंसारी याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर अन्य तीन पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून 76.7 मिलियनच्या नकली हिंदुस्थानी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

या नकली नोटा हिंदुस्थानमध्ये पोहचवण्यासाठी पाकिस्तान नवनवीन क्लृप्त्या लढवत आहे. 22 सप्टेंबर रोजी खलिस्तान समर्थक खालिस्तान जिंदाबाद फोर्सकडून 1 कोटी रकमेच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच पोलिसांनी 5 एके रायफल, 30 बोर पिस्टल, 9 हँड ग्रेनेड, 5 सॅटेलाईट फोन,2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. हे सर्व सामान पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमाने हिंदुस्थानमध्ये पाठवले होते. तसेच 25 सप्टेंबर रोजीही ढाका येथून पोलिसांनी 4.95 मिलियन नकली नोटा जप्त केल्या होत्या.

आपली प्रतिक्रिया द्या