
हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी पाकिस्तानला जबरदस्त दणका बसला आहे. हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर खडबडून जागे झालेला पाकिस्तान आता चीनकडून नवीन एअर डिफेन्स सिस्टम एचक्यू-19 खरेदी करणार आहे. यासाठी चीनकडे डील करायला सुरुवात केली आहे, अशी माहिती समोर आली आहे. ही नवीन डिफेन्स सिस्टम हिंदुस्थानच्या एस-400 एअर डिफेन्स सिस्टमला टक्कर देईल, असे पाकिस्तानला वाटत आहे. पाकिस्तानने वायू संरक्षण प्रणालीसह 40 चिनी जे-35 ए स्टील्थ लढाऊ विमानांना खरेदी करण्याचा प्लान बनवला असल्याची माहिती समोर आली आहे.
चीनची एचक्यू-19 बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टम आहे. या सिस्टमला नोव्हेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आले होते. डिफेन्स सिक्योरिटी एअरच्या माहितीनुसार, या सिस्टमला ब्रम्होस आणि स्कल्प-ईजी यासारख्या सुपरसोनिक आणि सुपरसोनिक क्रूझ मिसाईलसोबत हिंदुस्थानच्या अग्नी सीरिजच्या बॅलेस्टिक मिसाईल विरोधात तैनात केले जाऊ शकते.
हिंदुस्थानकडे सध्या जगातील सर्वोतम मिसाईल डिफेन्स सिस्टम एस-400 आहे. याला रशियाकडून खरेदी करण्यात आले होते. तर एचक्यू-19 या सिस्टमला चायना एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी कॉर्पोरेशनने डेव्हलप केले आहे. हे मिसाईल हल्ले रोखण्यासाठी हिट टू किल पद्धतीचा वापर करते. यात एक कमांड, कंट्रोल सिस्टम, शक्तिशाली रडार, टाइप 610 ए दिले आहे. त्यामुळे याची रेंज 4 हजार किलोमीटरपर्यंत आहे, असे सांगितले आहे. एचक्यू-19 ला 1990 च्या दशकापासून डेव्हलप करणे सुरू केले होते. याची पहिली चाचणी 2021 मध्ये करण्यात आली. ही अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टम आहे.