पाकड्यांनी दिल्लीवर डागलं ‘फतेह-2’ क्षेपणास्त्र, हिंदुस्थाननं हवेतच केलं नष्ट; हरयाणातील सिरसामध्ये सापडले अवशेष

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान-पीओकेमधील दहशतवादी तळ नष्ट केले. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थानवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला. पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनियान उल मरसूल’ सुरू केले असून हिंदुस्थानवरील अनेक शहरांवर सलग दुसऱ्या दिवसी हवाई हल्ला केला. हे सर्व हल्ले हिंदुस्थानने परतवून लावले आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली असून पाकिस्तानने हिंदुस्थानची राजधानी दिल्लीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानने दिल्लीवर लांब पल्ल्याचे ‘फतेह-2’ क्षेपणास्त्र डागले होते. पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकिस्तानचे हे क्षेपणास्त्र हरयाणाच्या सिरसामध्ये पोहोचले होते. याचवेळी हिंदुस्थानच्या एअर डिफेन्स सिस्टीमने हे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केले आणि दिल्लीवरील हल्ला परतवून लावला. आता या हल्ल्याचे व्हिडीओ समोर आले असून क्षेपणास्त्र हवेत नष्ट केल्याचे यात स्पष्ट दिसत आहे. या क्षेपणास्त्राचे अवशेष हरयाणातील सिरसा येथे सापडले आहेत.

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असून युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी सैन्याकडून हिंदुस्थानच्या महत्त्वाच्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्याचाही प्रयत्न केला जात आहे. शुक्रवारी रात्रीही पाकिस्तानने ड्रोनसह क्षेपणास्त्र डागले. पाकिस्तानने जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे फतेह-2 क्षेपणास्त्र डागले होते. या क्षेपणास्त्राची रेंज 400 किलोमीटर असून दिल्लीतील अति महत्त्वाच्या ठिकाणाला लक्ष्य करत हे क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. मात्र हिंदुस्थानने हरयाणातील आकाशातच या क्षेपणास्त्राला भस्मसात केले. तसेच प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानातील रावळपिंडीतील नूर खान एअरबेअस, पंजाब प्रांतातील शोरकोटमधील रफिकी एअरबेस आणि चकवालमधील मुरीद एअरबेसवर हल्ला चढवत धावपट्टी उद्ध्वस्त केली.