
सामना प्रतिनिधी । इस्लामाबाद
हिंदुस्थानी हवाई दलाचे शूर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानचे ‘एफ-16’ हे फायटर जेट पाडले त्यावेळी पाकच्या ‘एफ-16’चे पायलट शहाझुद्दीन हे पॅराशूटद्वारे पाकव्याप्त कश्मीरात उतरले, मात्र यावेळी पाकचे नागरिक एवढे बिथरले की त्यांनी हिंदुस्थानी समजून स्वतःचेच पायलट शहाझुद्दीन यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
विंग कमांडर अभिनंदन मायदेशात परत येताच हिंदुस्थानात आनंदोत्सव सुरू आहे तर दुसरीकडे पाकिस्तानात विंग कमांडर असलेल्या शहाझुद्दीन यांच्या कुटुंबावर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे. 27 मार्चला हिंदुस्थानी हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या विमानांना हिंदुस्थानी हवाई दलाने पिटाळून लावले. वीर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी आपल्या ‘मिग-21’मधून मिसाईल डागून पाकचे ‘एफ-16’ विमान पाडले. यावेळी ‘एफ-16’चे विंग कमांडर शहाझुद्दीन पॅराशूटद्वारे पाकव्याप्त कश्मीरातील नौशेरा सेक्टरमधील लाम खोर्यात उतरले. यावेळी जमाव बिथरला आणि हिंदुस्थानी समजून शहाझुद्दीन यांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेले शहाझुद्दीन यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा काल मृत्यू झाला.
वडील होते एअरमार्शल
‘फर्स्ट पोस्ट’च्या वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले आहे. हिंदुस्थानचे अभिनंदन यांचे वडील एस. वर्धमान हे निवृत्त एअरमार्शल आहेत तसेच शहाझुद्दीनचे वडील वसीमुद्दीन हेही पाकिस्तानी हवाई दलातील निवृत्त एअरमार्शल आहेत हा एक योगायोगच आहे. विंग कमांडर अभिनंदन सुखरूप हिंदुस्थानात परत आले तर दुसरीकडे पाकिस्तानी जनतेने आपल्याच विंग कमांडरला जीवे मारले. दरम्यान, सुरुवातीला पाकचे ‘एफ-16’ कोसळल्याचे वृत्त लंडनमधील वकील खालिद उमर यांनी दिल्याचे वृत्त आहे.





























































