
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्राची चौकशी एजन्सी सतत करत आहेत. या सगळ्यामध्ये ज्योती मल्होत्राबद्दल दररोज मोठे खुलासे होत आहेत. एनआयए आणि इतर गुप्तचर संस्थांसोबतच आता मुंबई पोलिसही ज्योती मल्होत्राची चौकशी करणार आहेत. सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या चौकशीदरम्यान, ज्योतीने कबूल केले आहे की, ती 2023 आणि 2024 मध्ये अनेक वेळा मुंबईला भेट दिली होती. मुंबई दौऱ्यादरम्यान तिने लालबागच्या राजाला देखील भेट दिली होती. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो काढले आणि व्हिडिओही बनवला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती जुलै 2024 मध्ये एका लक्झरी बसने मुंबईला पोहोचली. यानंतर, ती ऑगस्ट 2024 मध्ये कर्णावती एक्सप्रेसने अहमदाबादहून मुंबईला आली. त्यानंतर एका महिन्यानंतर, म्हणजे त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये, ती पुन्हा एकदा दिल्लीहून मुंबईला गेली. 2023 मध्ये, ती गणपती उत्सवादरम्यान ‘लालबागचा राजा’ दर्शनासाठी आली होती आणि लाखोंच्या गर्दीचा आणि संपूर्ण परिसराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता.
विविध एजन्सींनी केलेल्या चौकशीत ज्योतीने तिच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून अनेक व्हिडिओ आणि फोटो डिलीट केल्याचे समोर आले. पण हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आता परत मिळाले आहेत. ज्योतीने हे व्हिडिओ कोणाला पाठवले होते आणि त्यामध्ये काही संवेदनशील माहिती होती का, याचा तपास आता मुंबई पोलिस करत आहेत.
16 मे रोजी हिसार पोलिसांनी ज्योती मल्होत्रावर भारतीय दंड संहितेच्या कलम 152 आणि अधिकृत गुपिते कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली. पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले की ती बराच काळ संशयितांच्या संपर्कात होती आणि त्या काळात तिने त्यांना विविध प्रकारची महत्त्वाची माहिती देखील दिली होती.