हिंदुस्थानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा पाकिस्तानचा दावा फोल, उपग्रह छायाचित्रांवर झाले उघड

हिंदुस्थानी हवाई तळांवर हल्ले केल्याचा पाकिस्तानचा दावा फोल ठरला आहे. हिंदुस्थानच्या आदमपूर हवाई तळावर सुखोई-30 एमकेआयवर हल्ला करून त्याचे नुकसान केल्याचे पाकिस्तानी सैन्याने म्हटले होते. मात्र, उपग्रह छायाचित्रांवरून पाकिस्तानचे दावे खोटे असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने प्रसारित केलेले छायाचित्र हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्षापूर्वीच्या सुमारे महिनाभरआधीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

छायाचित्र विश्लेषक डेमियन सायमन यांनी पाकिस्तानचा हिंदुस्थानी हवाई दलाच्या सुखोई लढाऊ विमानाचे नुकसान केल्याचा दावा खोडून काढला आहे. पाकिस्तान प्रसारित करत असलेले छायाचित्र प्रत्यक्षात मार्चमध्ये देखभाल सुरू असलेल्या मिग-29 चे आहे, असे सायमन यांनी म्हटले आहे.

छायाचित्रात नेमके काय?

मार्च 2025 मध्ये घेतलेल्या या छायाचित्रावरून असे दिसून आले की, हे छायाचित्र हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातील संघर्षापूर्वीचे आहे. या छायाचित्रात मिग-29 च्या देखभालीचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. इंजिन टेस्ट पेंडजवळील काळी काजळी ही कायमच असते, हे युद्धातील नुकसान नाही असे सायमन यांनी एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.