
पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पालघरमधील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. शहरातील सुंदरम शाळेजवळील एका इमारतीमध्ये बेकायदेशीर असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून ५ जणांची टोळी जेरबंद केली. कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक सुरू होती.
पालघर शहरालगत सुंदरम परिसरात अवैध धंद्यांचे पेव फुटले आहे. सुंदरम शाळेच्या लगत असलेल्या ‘फिया एकांत’ या इमारतीमधील तिसऱ्या माळ्यावर बेकायदा कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमधून आर्थिक आणि सायबर फसवणुकीचे प्रकार सुरू होते. पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती समजल्यानंतर सोमवारी रात्री १२ वाजता या इमारतीत धाड टाकली. पोलिसांनी यावेळी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ४ लॅपटॉप, १२ मोबाईल, ४ हेड फोन, १ राऊटर, १ डोंगल हस्तगत करण्यात आला. आरोपींमध्ये भरत ललानी (३५) मीरा रोड, रोहित निंबाळकर (२९) नायगाव, रोहित झोन्हे (२३) मीरा रोड, अमरदीप गिल (२४) पंजाब आणि सागर पाठडिया (२९) यांचा समावेश आहे.
कॉल सेंटरला आशीर्वाद कुणाचा?
सीबीआयच्या पथकाने सप्टेंबर २०२५ मध्ये इगतपुरीमधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या अड्ड्यावर छापा टाकून पाचजणांना अटक केली होती. त्यामधील मीरा-भाईंदर येथील दोन आरोपींनी रायगड व पालघर जिल्ह्यात वरिष्ठ अधिकारी यांना हप्ता देऊन बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची कबुली दिली होती. त्यामुळे आता पालघरमध्ये कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कॉल सेंटरला आशीर्वाद होता हे तपास करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.




























































