
राज्यातल्या तब्बल तेरा जिल्ह्यांना आणि 75 तालुक्यांना निसर्गचक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला आहे. या वादळग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकारचे सर्व पातळ्यांवर मदत सुरु आहे. सध्याच्या घडीला पालघर जिह्यातील सातपाटी, अलिबाग, रत्नागिरी व मालवणमध्ये वीजेच्या भूमिगत वायर टाकण्याचे (अंडरग्राऊंड केबल) काम युद्धपातळीवर सुरू आहे अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.
निसर्गचक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मागील चार दिवस केंद्रीय पथक वादळग्रस्त भागाच्या दौऱयावर होते. वादळग्रस्त भागाचा आढावा घेतल्यानंतर हे पथक दिल्लीला रवाना झाले आहे. आता हे पथक केंद्र सरकारला अहवाल पाठवणार आहे. या संदर्भात राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केंद्राची मदत येण्यापूर्वीच राज्य सरकारने मदत सुरु केली आहे. वादळग्रस्तांना कपडे, भांडी, केरोसीन, पिण्याचे पाणी पुरवण्यात येत आहे. प्रत्येक पुटुंबाला दहा हजार रुपयांची मदत दिली जात आहे. या वादळात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शेतकऱयांना बी-बियाणे वाटप, रोपांचे वाटप व रोजगार हमी योजनेअंतर्गत नव्या फळबागा लागवड योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
भूमिगत केबल
या वादळात वीजेच्या खांबांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भविष्यात किनारपट्टीच्या भागातील विजेच्या खांबांना धोका नको म्हणून किनारपट्टीच्या भागात विजेच्या भूमिगत वायर टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालघर, अलिबाग शहर, रत्नागिरी या तीन ठिकाणी हे काम सुरू आहे. मालवण व इतर काही ठिकाणीही हे काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.






















































