पालघरमध्ये बनावट नोटांचा छापखाना, आरोपींना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघरमध्ये घरात बनावट नोटा छापून त्या विविध ठिकाणी चलनात आणून देशाच्या अर्थव्यवस्थेला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणाऱया चौघांना मुंबई गुन्हे शाखा युनिट-7ने बेडय़ा ठोकल्या आहेत. आरोपींकडून तब्बल 35 लाख 54 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा तसेच नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

हिंदुस्थानी चलनातील बनावट नोटा विकण्यासाठी दोन इसम विक्रोळी परिसरात येणार असल्याची माहिती युनिट-7चे प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. त्यानुसार श्रीधनकर यांनी एपीआय महेंद्र दोरकर तसेच सुभाष मोरे, शशिकांत माने आदींच्या पथकासह विक्रोळी पूर्वेकडील प्रवीण हॉटेलजवळ सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार दोन इसम तेथे येताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

तेव्हा त्यांच्या अंगझडतीत त्यांनी विकण्यासाठी आणलेल्या दोन लाख 80 हजार किमतीच्या बनावट नोटा मिळाल्या. अब्दुला खान आणि महेंद्र खांडसकर अशी त्यांची नावे असून त्यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता महेंद्रने त्याच्या पालघर येथील घरात नोटा छापल्याचे सांगितले.