पाली-सुधागड-पाच्छापूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

[email protected]

सुधागड हा प्राचीन किल्ला जो भोरपगड या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला भोर संस्थानाचे वैभवच. या परिसरातील ठाणाळे लेणी, गडावरील तलाव, इथलं भोराईचं मंदिर हे सारं काही पाहण्यासारखं आहे. श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श झालेल्या या गडाला एकदातरी अनुभवयाला हवे. सुधागडचा वैभववारसा आणि नजिकच्या स्थळांच्या भटकंतीचा अनुभव देणारा लेख.

राजपुतन्यातील दुर्गादास राठोड याने दिल्लीपती औरंगजेबाचा शहजादा अकबर याला औरंगजेबाविरुद्ध बंड करण्याकरिता उद्युक्त केले. राजपूत दुर्गादास राठोड आणि शहजादा अकबर यांनी औरंगजेबाविरुद्ध जंगचे ऐलान केले, पण औरंगजेबाच्या एका पत्राने पारडे फिरले आणि राजपूत शहजादा अकबराला जंगच्या मैदानात एकटं सोडून निघून गेले. भांबावलेला अकबर दुर्गादास राठोडच्या सल्ल्यानुसार दक्षिणेत आश्रय घेण्यासाठी महाराष्ट्रात आला. शंभूराजांनी अकबराला आश्रय दिला. पुन्हा दुर्गादास राठोडने राजपूत, मराठा आणि शहजादा अकबर यांना शंभूराजांच्या नेतृत्वाखाली औरंगजेबाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र आणण्याची तयारी सुरू केली. आता खासा औरंगजेब आपल्या बलाढय़ सैन्यासह दक्षिणेत उतरला. घाबरलेला शहजादा अकबर शंभूराजांचा पक्ष सोडून इराणला निघून गेला. औरंगजेब नावाचे वादळ महाराष्ट्रावर घोंगाऊ लागले.

सुधागड किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या गावात शंभूराजे आणि शहजादा अकबर यांची भेट झाली. आज या बादशहापूर गावाचे पाच्छापूर असे नामकरण झाले आहे. पालीच्या गणपतीपासून वीस कि.मी.वर पाच्छापूर गाव आहे. गावातील गावकरी ज्या ठिकाणी स. शंभूराजे आणि शहजादा अकबर यांची भेट झाली. ती ‘बादशहाची सदर’ ही जागा आवर्जून दाखवतात. हत्तीचा माळ ही गावातील अजून एक ऐतिहासिक खूण.

पाच्छापूरच्या पुढे असलेल्या ‘दर्यापूर’ या ठाकूर वाडीतून किल्ले सुधागड शिडीच्या वाटेनी जवळ करता येतो. सुधागडावरील भोराई देवीचे मंदिर आणि रायगडावरील महाद्वाराशी आठवण करून देणारा दरवाजा आवर्जून पाहण्याजोगा. पूर्वेकडील तेलबैलाची भिंत आणि पश्चिमेकडील सरसगडाचे विहंगमदृश्य बघून आपण धोंडसे नाडसूरला गडउतार होऊ शकतो. गडाचा आवाका प्रचंड आहे. वाट दमछाक करणारी आहे. सोबत वाटाडय़ा घेऊन गेलेले उत्तम.
‘पाली’ हे सुधागड तालुक्यातील भरभराटीस येणारे नवे शहर. इथे मुक्काम करून आपण आपली भटकंतीची हौस भागवू शकतो. पालीतील श्रीबल्लाळेश्वर गणपती मंदिर, सरसगड, उद्धर-रामेश्वर येथील गरम पाण्याची कुंडे, एकवीस गणपती मंदिर, कोंडजाई येथील नदीतील राजंणखळगे, कोंडगावरचे धरण, ठाणाळेलेणी, भेलीव येथील मृगगड, जांभूळपाडा येथील गणपती मंदिर, पुरातन विरेश्वर मंदिर अशा अनेक ठिकाणांना भेटी देऊ शकतो.

मुंबई-पुण्यातून निघून खोपोली, पाली रस्त्यावरील बोंबल्या विठोबा येथील विठोबा मंदिर, ज्या मंदिरात जगदगुरू तुकाराम महाराज दर्शनास येत. शेमडी गावाजवळील आदिवासावाडी जवळील नदीपात्रात असलेला ‘समरभूमी उतरखिंडीचा’ विजयस्तंभ, परळी-पडेली गावाजवळील औढय़ांच्या माळावर असलेली बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी. याच औढय़ांच्या माळावर छ. शंभूराजांनी त्यांच्याविरुद्ध कटकारस्थानं करणाऱयांना हत्तीच्या पायी दिले होते अशी एक दिवसीय भटकंती आपण करू शकतो. याची सांगता आपण पाली-पाच्छापूरला करू शकतो.

जिथे महाराष्ट्रासमोर दिल्लीचे तख्त झुकले त्या पाच्छापूरला आणि पाली परिसराला अवश्य भेट द्या! आणि दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा याची अनुभूती घ्या!