
पंढरपूरात विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 15 मार्चपासून देवाचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे.तसेच पुढील तीन महिने विठ्ठलाचे दररोज फक्त 5 तास मुखदर्शन सुरू असणार आहे. तसेच इतरवेळी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र, मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. आषाढीपूर्वी गाभाऱ्यातील सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. तसेच या काळात देवाच्या सर्व नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही. मात्र पाद्य, तुळशी पूजा बंद राहणार असे औसेकर महाराज यांनी सांगितले.
विठ्ठलाच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेटप्रुफ काचेचे संरक्षण कवच निर्माण करण्यात येणार आहे. मंदिरातील आणि खास करून विठ्ठलाच्या गर्भगृहातील बदल करण्यासाठी 15 मार्चपासून पुढील काळात हे काम सुरू असेल. या कामासाठी साधारण 45 दिवसांचा कालावधी लागणार असला तरी ऐनवेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता 5 जूनपर्यंत मंदिराचे सर्व काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे आता भाविकांना 30 फुटांवरून मुखदर्शन मिळणार आहे. तर पुढील 45 दिवस मूर्ती संवर्धनासाठी भाविकांना आता पदस्पर्श दर्शन करता येणार नाही. यामध्ये येणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत 15 एप्रिल ते 21 एप्रिल भाविकांना पूर्ण वेळ मुखदर्शन घेता येणार आहे.



























































